लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महापालिका आरक्षण सोडतीमुळे केशवराव भोसले नाटयगृह येथे उत्कंठा, तणाव आणि जल्लोष असे वातावरण पाहण्यास मिळाले. २४ प्रभाग सर्वसाधरण खुले झाल्यामुळे या प्रभागातील इच्छुकांनी परिसरात आतषबाजी केली, तर आरक्षण पडल्यामुळे संधी हुकलेल्यांमध्ये नाराजी पसरली आहे. शहरात ‘कही खुशी, कही गम’ अशी स्थिती आहे.
महापालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांच्या नजरा होत्या. आपला प्रभागावर कोणते आरक्षण पडणार, प्रभाग रचना काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच केशवराव भोसले नाट्यगृहात पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. अनुसूचित जाती प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग, महिला प्रवर्गाचे आरक्षण झाल्यानंतर शिल्लक २४ प्रभाग खुले झाल्याचे स्पष्ट होताच नाट्यगृहात त्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
चौक़ट
थेट प्रक्षेपणाचा फायदा
महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाट्यगृहात गर्दी होऊ नये म्हणून युट्यूब, फेसबुक आणि स्थानिक केबल वाहिनीवर आरक्षणाच्या सोडतीचे थेट प्रेक्षपण केले. यूट्यूब आणि फेसबुकवर २००० लोकांनी आरक्षणाची सोडत पाहिली. खासबाग मैदानातही एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती. येथेही लोक मोठ्या संख्येने होते.
चौकट
तपासणी करून नाट्यगृहात प्रवेश
महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या नावाची वहीत नोंद केली. थर्मल तपासणी, सॅनिटायझर लावूनच नाट्यगृ्हात प्रवेश दिला. सोशल डिस्टन्सिंगसाठी रांगा लावून प्रवेश दिला. सभागृहातही एक आड एक खुर्चीवर बसण्याची सोय केली होती.
चौकट
पोलिसांचा चोख बंदोबस्त
अनुचित प्रकार घडू नये तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी नाट्यगृह परिसरात चोख पोलीस बंदोबस्त होता. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्यासह पोलिसांंचे पथक तैनात होते. परिसरात बॅरिकेड लावण्यात आले होते.
चौकट
कलादालनात प्रभाग रचनेचे नकाशे
आरक्षणासोबत प्रारूप प्रभाग रचनाही यावेळी जाहीर करण्यात आली. ८१ प्रभागांमध्ये कोणता परिसर आहे याची माहिती देण्यात आली. कलादालनात यासंदर्भातील नकाशेही नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध केले आहेत.
चौकट
शाहू कॉलेज, प्रतिभानगरमधील आरक्षण कायम
शहरातील ७९ प्रभागातील आरक्षणात बदल झाला आहे. मात्र, प्रभाग क्रमांक १० शाहू कॉलेज आणि प्रभाग क्रमांक ४१ प्रतिभानगर प्रभागाचे सर्वसाधारण महिला हे आरक्षण यंदाही कायम राहिले आहे. महिला आरक्षण सोडतीवेळी यापूर्वी महिला प्रभाग नसलेले २२ प्रभाग थेट आरक्षित केले. २०१५ मध्ये महिला आरक्षण असलेले, मात्र यापूर्वी कधीही महिला आरक्षण नसलेल्या १७ प्रभागांमधून दोन प्रभाग निवडण्यात आले. यामध्ये शाहू कॉलेज आणि प्रतिभानगर प्रभागाच्या चिठ्ठ्या आल्या. यामुळे सूरमंजिरी लाटकर आणि छाया पोवार यांना पु्न्हा संधी आहे.