तमदलगे डोंगरात दोन दिवसांनंतरही गव्यांचा माग न सापडल्याने त्यांच्या परतण्याबाबत खुद्द वन विभागच साशंक बनला आहे. परिणामी कुंभोज, नेज, बाहुबली, दानोळीच्या डोंगर परिसरातील शेतकऱ्यांतील गव्यांबाबतची भीतीही अद्याप कायम आहे.
येथील तांबोळी खोरा परिसरात गव्यांच्या कळपाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने गुरुवारी पीक नुकसानीची पाहणी केली. या परिसरात गव्यांनी गेल्या दोन दिवसांपासून पिकांचे कोणतेही नुकसान केले नसून मिरचीची धुरी केल्याने गव्यांनी मुक्काम हलवला असल्याची शक्यता वन कर्मचाऱ्यांनी वर्तवली आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सलग दोन दिवस तमदलगे डोंगर परिसर पिंजून काढला. पण गव्यांचा कोठेही माग दिसून आला नाही.