कोल्हापूर : कोल्हापूरपासून १३० किलोमीटरवर असणाऱ्या भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ल्यावरील महादेव मंदिर काळाच्या ओघात पडले होते. त्याची पुनर्उभारणी ‘निसर्गवेध परिवार’च्या तीसजणांनी चार महिन्यांच्या अथक प्रयत्नांतून केली. कोल्हापूर जिल्ह्यातील गडकिल्ल्यांमध्ये ‘दुर्लक्षित असलेला किल्ला’ म्हणून भुदरगड तालुक्यातील रांगणाकडे पाहिले जाते. या किल्ल्यावरील दीपमाळ, गणपती मंदिर, हवालदाराचा वाडा, ऐतिहासिक तोफ भग्नावस्थेत होत्या. त्यांची दुरुस्ती करून पर्यटक आणि आजच्या पिढीला या किल्ल्याची माहिती व्हावी, त्याकाळच्या बांधलेल्या वास्तू, मंदिरे, वाडे आजही कसे चांगले राहतील याचा विचार करून कोल्हापूरच्या निसर्गवेध परिवाराने दुर्गसंवर्धनासाठी हा किल्ला दत्तक घेतला. त्यानुसार किल्ल्यातील पडझड झालेल्या वास्तू दुरुस्ती करण्याचे काम दुर्ग अभ्यासक भगवान चिले यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आले. प्रथम किल्ल्यावरील आठ दरवाज्यांची डागडुजी करून त्यानंतर दीपमाळ उभी करण्यात आली. गणपती मंदिर, हवालदाराचा वाडा, गडावरील विविध ठिकाणांसाठी माहिती फलक उभे केले. ऐतिहासिक तोफांची शोधमोहीमही राबविली. याचदरम्यान काळाचा ओघात भग्नावस्थेत असलेल्या महादेव मंदिराची पुनर्उभारणी करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे कामास सुरुवात झाली. परिवारातील तीस सदस्यांनी महिन्यातील चार दिवस असे काम करत व एक लाख २२ हजार इतक्या स्वखर्चाने महादेव मंदिराची उभारणी केली. त्याकरिता मंदिरापर्यंत सिमेंट, वाळू नेण्यासाठी मजूर मिळत नसल्याने परिवारातील सदस्यांनीच डोक्यावरून बांधकाम साहित्य नेले. चार महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर जुन्या पद्धतीप्रमाणेच महादेव मंदिर पुन्हा डोलाने उभे राहिले. मंदिरासाठी यांनी केला रात्रीचा दिवसभगवान चिले, इम्रान शेख, जमीर मेस्त्री, अवधूत पाटील, कांतीभाई पटेल, सुहास पाटील, अनिल माने, पंकज पाटील, तानाजी चौगुले, दीपक पाटील, विनायक हिरेमठ, अभिजित दुर्गुळे, अभिजित नरके, शशिभाऊ कदम, विजय काळे, अवधूत नागवेकर, गोपी नार्वेकर, संदीप प्रभूलकर, सत्यजित जाधव, विश्वनाथ चिले, लोकनाथ जोशी, अशोक ठमके, युवराज कुंभार, संदीप पाटील, गुरुनाथ वास्कर व शिवडाववासीयांचे सहकार्य लाभले. निसर्गवेध परिवारातील तीस सदस्यांच्या चार महिन्यांच्या अथक श्रमातून रांगणावर पुन्हा डोलाने उभे राहिलेले ऐतिहासिक महादेव मंदिर.पहिल्या छायाचित्रात भग्नावस्थेतील महादेव मंदिर. दुसऱ्या छायाचित्रात डोक्यावरुन साहित्य किल्ल्यावर नेताना ‘निसर्गवेध’चे कार्यकर्ते. तिसऱ्या छायाचित्रात मंदिर पुनर्बांधणीसाठी फॅब्रिकेशनची स्टील फे्रम उभारली.
रांगण्यावरील भग्न मंदिराचा कायापालट
By admin | Updated: April 10, 2015 23:50 IST