पट्टणकोडोली : गेल्या पाच दिवसांपासून येथील आरजी मळा भागात शेतीपंपाची वीज बंद असल्याने याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या प्रतिष्ठित शेतकऱ्यांशी उद्धट आणि अरेरावीची भाषा करून उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रकार येथील महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांनी केला. याबाबत अनेकवेळा तक्रारी होऊनही महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार करत असल्याने शेतकरी व नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, त्यांची खातेनिहाय चौकशी करून कर्तव्याची जाणीव करून द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. पट्टणकोडोली वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रात येथीलच स्थानिक कनिष्ठ अभियंता कार्यरत आहेत. परंतु, ग्राहकांना तसेच तक्रारदारांना अरेरावी करून उडवाउडवीची उत्तरे देणे आणि उद्धट प्रकार वाढल्याने येथे वाद-विवादाचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे हुपरीचे उपअभियंता माने यांनी अनेकदा अशावेळी मध्यस्थी करून वाद मिटवले आहेत. अनेकवेळा तक्रारी होऊनही वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार करीत असल्याचे म्हणणे ग्राहक व नागरिकांचे आहे. त्यामुळेही याविषयी तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. (वार्ताहर )
अभियंत्यांविरोधात ग्राहकांची नाराजी
By admin | Updated: July 14, 2014 01:00 IST