कोल्हापूर : गेल्या शंभर वर्षांपासून विशेषत: मसाले आणि मिरच्यांसाठी प्रसिद्ध असणारे छत्रपती शिवाजी मार्केट येथील रामचंद्र तवनाप्पा मूग या किराणा माल दुकानाकडून जिल्हा व जिल्ह्याबाहेर विविध ठिकाणी फ्रँचायझी देण्यात येत असल्याची माहिती राहुल मूग यांनी पत्रकार परिषदेत दिली. किराणा माल दुकानाची फ्रँचायझी देणारे कोल्हापुरातील पहिले किराणा माल दुकान ठरल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
राहुल मूग म्हणाले, विश्वासार्हता, दर्जेदार माल आणि पारदर्शक व्यवहाराच्या जोरावर रामचंद्र तवन्नाप्पा मूग दुकानाने मसाले, मिरची पावडर, धान्य, कडधान्य आदींमध्ये एक खास ब्रॅण्ड नावारूपाला आणला आहे. चौथी पिढी या व्यवसायात आहे. शहरासह अमेरिकेमध्येही चटणी, मसाले पोहोच केला आहे. कोरोनामध्ये बंद असताना शहरातील ग्राहकांना घरपोहोच सेवा दिली. ग्राहकांतूनही समाधान व्यक्त करण्यात आले. मात्र, जिल्ह्यातील सर्वच परिसरात सेवा देता आली नाही. चटणी करण्याच्या सिझनमध्येच कोरोना आल्यामुळे अनेकजण मालापासून वंचित राहिले. त्यानंतर ग्राहकांनी इतर ठिकाणीही शाखा सुरू करण्याची मागणी केली. त्यामुळेच फ्रँचायझी देण्याचा निर्णय घेतला. एक महिन्यापूर्वी रंकाळा, डी मार्ट शेजारीच पहिली फ्रँचायझी देण्यात आली आहे. त्याला मिळणारा उदंड प्रतिसाद नक्कीच उमेद वाढविणारा आहे. त्यामुळे कदमवाडी, प्रतिभानगर येथे लवकर दोन फ्रँचायझी देण्यात येणार आहे. याचबरोबर जिल्ह्याबाहेरही फ्रँचायझी देण्याचा मानस आहे. या माध्यमातून पैसे मिळविणे हा विषय नसून सामाजिकदृष्ट्या विचार आहे तसेच रोजगार मिळवून देणेही आहे. यावेळी शैलेश गर्दे, ज्ञानदेव पाटील उपस्थित होते.
बातमीदार : विनोद