अर्जुनवाड : शिरटी (ता. शिरोळ) येथे होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या एकूण १३ जागांसाठी २८ उमेदवार लढतीसाठी रिंगणात उतरले आहेत. यामध्ये १५ स्त्रिया व १३ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे.
येथे प्रामुख्याने यड्रावकर गट विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यामध्ये चुरशीची दुरंगी लढत होणार आहे, तर प्रभाग पाचमध्ये तिरंगी लढत होणार आहे. एकूण १३ जागांसाठी निवडणूक होणार असून ७ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर ग्रामपंचायतीवर महिलाराज येणार आहे.
शिरटी हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला समजला जातो. गेली पाच वर्षे ग्रामपंचायतीवर स्वाभिमानी संघटनेची एकहाती सत्ता होती. तत्पूर्वी यड्रावकर गटाने अनेक वर्षे सत्ता उपभोगली आहे. मात्र, यावेळी निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमानीत फूट पडल्याने त्याचा फायदा इतरांना कितपत होणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. येथे स्वाभिमानीतून बाहेर पडलेला एक गट व भाजपप्रणित यादव गटाने स्थानिक पातळीवर यड्रावकर गटाशी मैत्री केली आहे. तसेच स्वाभिमानीनेदेखील काँग्रेसचे गणपतराव पाटील यांचा गट व उल्हास पाटील यांच्या गटाला एकत्र घेऊन यड्रावकर गटविरुद्ध लढण्याची जय्यत तयारी केली आहे. तसेच प्रभाग पाचमध्ये यड्रावकर गटातीलच सहा उमेदवार एकमेकांविरुद्ध रिंगणात असून स्वाभिमानीचे उमेदवारदेखील विरोधात रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे येथे दुरंगी व तिरंगी लढत पाहावयास मिळणार आहे.
* एकूण प्रभाग - पाच, सदस्य संख्या - तेरा
* एकूण मतदार - ४२२४