कोल्हापूर : कोरोना आणि एसईबीसी आरक्षणाच्या स्थगितीमुळे लांबणीवर पडलेली शहरातील अकरावीची प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया गुरुवारपासून पूर्ववत सुरू झाली. प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थिती लावल्याने विविध कॉलेज कॅम्पस गर्दीने फुलले. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.
केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने शहरातील विविध ३४ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीची निवड (गुणवत्ता) यादी बुधवारी (दि. २)जाहीर केली. प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयांची माहिती या समितीने विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे कळविली. प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यासाठी महाविद्यालयांना सूचना केली. त्यानुसार गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली. शहाजी कॉलेज, महावीर महाविद्यालय, विवेकानंद कॉलेज, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, न्यू कॉलेज, गोखले कॉलेज, कमला कॉलेज, राजाराम महाविद्यालय, डीआरके कॉमर्स कॉलेज, आदी महाविद्यालयांमध्ये कोरोनाबाबतची दक्षता घेऊन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. बहुतांश विद्यार्थी हे आपल्या पालक आणि मित्र-मैत्रिणींसमवेत आले होते. प्रवेश अर्ज, दहावीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, आदी कागदपत्रांची तपासणी करून विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात येत होता. प्रवेशाची वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांची महाविद्यालय परिसरात गर्दी होती. प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करण्याची मुदत मंगळवार(दि. ८)पर्यंत आहे.
चौकट
‘एसएमएस’ आला नसल्याची तक्रार
ऑनलाईन अर्ज भरला असूनही एसएमएस आला नसल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी महावीर महाविद्यालयातील प्रवेश यंत्रणेकडे केली. त्यावेळी निवड यादी तपासून पाहण्यात आली. मात्र, त्यामध्ये संबंधित विद्यार्थ्यांची नावे आढळून आली नाहीत. त्यावर त्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडे संपर्क साधण्यास तेथील शिक्षकांनी सांगितले.
चौकट
बारकाईने माहिती
प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करताना पालक आणि विद्यार्थी हे प्रवेश अर्ज भरण्यापासून ते महाविद्यालयांतील ग्रंथालय, क्रीडा, शैक्षणिक सुविधांपर्यंतची माहिती बारकाईने घेत होते.
प्रतिक्रिया-
अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याचा आनंद होत आहे. मी विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहे. या प्रवेशाच्या निमित्ताने पहिल्यांदाच कॉलेज कॅम्पसमध्ये पाऊल ठेवले आहे.
-अंकित पाटगांवकर, लक्ष्मीपुरी.
प्रतिक्रिया
कोरोनामुळे लांबणीवर पडलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने आम्हा विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. शिक्षण सुरू होणार असल्याने कॉलेजमध्ये येण्याची मला उत्सुकता लागली आहे.
-गौरी पवार, शिरोली.
फोटो (०३१२२०२०-कोल-अकरावी प्रवेश ०१) : कोल्हापुरात गुरुवारी अकरावीच्या प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली. महावीर महाविद्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेऊन प्रक्रिया राबविण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)
फोटो (०३१२२०२०-कोल-अकरावी प्रवेश ०२) : कोल्हापुरात गुरुवारी अकरावीच्या प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली. विवेकानंद महाविद्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेऊन प्रक्रिया राबविण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)
फोटो (०३१२२०२०-कोल-अकरावी प्रवेश ०३) : कोल्हापुरात गुरुवारी अकरावीच्या प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बहुतांश विद्यार्थी, विद्यार्थिनी या पालकांसमवेत आल्या होत्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)