राजाराम पाटील - इचलकरंजी --निवडणुकीचा हंगाम संपल्यामुळे आता वस्त्रनगरीला दीपावली बोनसचे वेध लागले आहेत. वस्त्रोद्योगातील सायझिंग, यंत्रमाग, आॅटोलूम, प्रोसेसिंग अशा घटक उद्योगांत असलेल्या ६५ हजार कामगारांना ११० कोटी रुपयांचा बोनस मिळणार आहे. इचलकरंजी हे सुमारे दीड लाख यंत्रमाग व आॅटोलूमचे वस्त्रोद्योगातील प्रमुख केंद्र आहे. येथे यंत्रमाग क्षेत्रामध्ये कामगारांची संख्या ५० हजार असून, त्यामध्ये यंत्रमाग कामगार, कांडीवाला, जॉबर, दिवाणजी, आदींचा समावेश आहे. मागील वर्षी यंत्रमाग कामगारांच्या वेतनवाढीसाठी झालेल्या आंदोलनामध्ये यंत्रमाग कामगारांना १६.६६ टक्के बोनस देण्याचा करार झाला आहे. त्याप्रमाणे यंत्रमाग कामगारांना १५ ते १७ हजार रुपये बोनस मिळणार असून, कांडीवाल्यांना १२ ते १४ हजार, जॉबर व दिवाणजी यांना १८ ते २० हजार रुपये बोनस मिळेल. साधारणत: ही रक्कम ८५ कोटी रुपये भरते.आॅटोलूम क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या पगाराप्रमाणे १६.६६ टक्के बोनस मिळेल. या क्षेत्रातील कामगारांची संख्या सुमारे सात हजार आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष कामगाराबरोबर कांडीवाला, जॉबर, आईलर, शिफ्ट जॉबर, आदींचा समावेश होतो. यांना सुमारे १५ ते १७ हजार रुपये बोनसपोटी मिळतात. ही रक्कम सुमारे १२ कोटी रुपये होते. सायझिंग क्षेत्रामध्ये १७० कारखाने असून, त्यामध्ये तीन हजार कामगार कार्यरत आहेत. या कामगारांमध्ये सायझर, बॅक सायझर, वार्पर, फायरमन, दिवाणजी, हमाल, आदींचा समावेश आहे. या कामगारांना १४ ते १८ हजार रुपये बोनसपोटी मिळतील. ही रक्कम साधारणत: पाच कोटी रुपये होते.प्रोसेसर्स उद्योगात २५ पॉवर प्रोसेसर्स आणि सुमारे ५० हँड प्रोसेसर्स आहेत. सुमारे तीन हजार कामगार येथे काम करतात. त्यांना १० हजार ते १५ हजार रुपये इतका बोनस मिळतो आणि ही रक्कम चार कोटी रुपये होते. याचबरोबर सूत व कापड वाहतूक करणारे सुमारे चार हजार हमाल आहेत. त्यांना त्यांच्या कामानुसार १५ ते २० टक्के बोनस मिळत असतो. ही रक्कम पाच कोटी रुपये होते.महिलांनासुद्धा १५ कोटी रुपयांचा बोनसवस्त्रोद्योगामध्ये महिला कामगारांची संख्यासुद्धा लक्षणीय आहे. प्रामुख्याने कांडीवाले, प्रोसेसर्स आणि गारमेंट उद्योगामध्ये महिला वर्ग आहे. घरकामाचा गाडा ओढत या महिला या क्षेत्रात कार्यरत असून, आपल्या कुटुंबाला त्या आर्थिक मदत करीत असतात. अशा महिला कामगारांची संख्या सुमारे १५ हजार आहे. त्यामुळे महिला कामगारांनासुद्धा १५ कोटी रुपयांचा बोनस मिळतो.ंतीन दिवसांत ११० कोटी रुपये मिळणारयंत्रमाग व आॅटोलूम कामगारांबरोबर प्रोसेसिंग व सायझिंग उद्योगातील कामगारांच्या हातात २० ते २२ आॅक्टोबर या तीन दिवसांत ११० कोटी रुपयांची रक्कम पडणार आहे. बोनसची रक्कम हातात मिळाल्यानंतर संबंधित कारखाने बंद होतात आणि त्यानंतर ते साधारणपणे दीड ते दोन आठवड्यानंतर उघडले जातात. ८ नोव्हेंबला पुन्हा वस्त्रनगरीची धडधड पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
वस्त्रनगरीला लागले बोनसचे वेध
By admin | Updated: October 17, 2014 22:55 IST