कोल्हापूर : राज्य शासनाने निश्चित केलेल्या ड्रेसकोड अध्यादेशाची अंमलबजावणी कोल्हापूर महानगरपालिकेत येत्या दोन-तीन दिवसांत केली जाईल, असे महापालिकेच्या रचना व कार्यपद्धती विभागातून सांगण्यात आले.
महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड ठरवून देण्यात आलेला असून त्याची अंमलबजावणी पूर्वीपासूनच सुरू आहे. शिपाई, रुग्णालयातील वॉर्डबॉय, आया, वाहनचालक तसेच आरोग्य विभागाकडील सर्व कर्मचारी, आरोग्य निरीक्षक त्यांना दिलेल्या ड्रेसकोडप्रमाणे पेहराव करूनच कामावर उपस्थित राहतात.
केवळ कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये आतापर्यंत कोणता ड्रेसकोड नव्हता. यापुढेही तो विशिष्ट ड्रेसकोड असणार नाही; परंतु कोणत्याही कर्मचाऱ्यांना जीन्स व टीशर्ट घालता येणार नाही. प्रत्येकाला कार्यालयात येताना पायात बूट तसेच नीटनेटका पेहरावा असावा लागणार आहे. गेल्या महिन्याभरापासून सर्वच कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. नवीन ड्रेसकोडसंदर्भात दोन-तीन दिवसात एक परिपत्रक सर्व कर्मचाऱ्यांना दिले जाणार असल्याचे रचना व कार्यपद्धती विभागाचे प्रमुख अशोक यादव यांनी सांगितले.
ड्रेसकोड चांगला उपक्रम
ड्रेसकोड एक चांगला उपक्रम आहे. त्यामुळे कार्यालयीन शिस्त निर्माण होईल. कर्मचारी कोण हे नागरिकांना समजून येईल. प्रत्येकाने ड्रेसकोड संदर्भातील नियम पाळला पाहिजे, अशा भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.