वडणगे : जनतेला विकासाची स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने महागाई वाढवून जनतेची फसवणूक केली आहे. सामान्यांसाठी आणलेल्या योजना हे सरकार बंद पाडण्याच्या तयारीत आहे. येत्या काळात उद्योजकांच्याच फायद्याचे निर्णय या सरकारकडून घेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार पी. एन. पाटील यांनी केले. वडणगे (ता. करवीर) येथे बी. एच. पाटील युवक मंचचे उद्घाटन व युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.पी. एन. पाटील म्हणाले, काँग्रेस आघाडी सरकारने आणलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजना, जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजना, आदी महत्त्वपूर्ण योजना बंद करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नरत आहे. त्यामुळे जनसामान्यांचे अतोनात हाल होणार आहेत. आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे व आघाडी सरकारने जनतेसाठी केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवावीत, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी जि.प.चे माजी शिक्षण सभापती बाळासाहेब खाडे, जि. प.चे माजी सदस्य बी. एच. पाटील, अनिल ढवण यांची भाषणे झाली. पोलीस भरतीत निवड झालेल्या व दहावी, बारावी परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार पी. एन. पाटील यांच्या हस्ते झाला.यावेळी ‘गोकुळ’चे संचालक सुरेश पाटील, एस. बी. पाटील, बी. एच. पाटील, यशवंत जाधव, पं. स.चे सदस्य अर्जुन पाटील, शिवाजी कवठेकर, सज्जन पाटील, ग्रा. पं.चे सदस्य सुनील पंडित, तानाजी तेलवेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मंचचे अध्यक्ष महादेव बोने यांनी स्वागत केले. निवृत्ती चौगले यांनी प्रास्ताविक केले. नितीन देवणे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
मोदी सरकारकडून फसवणूक
By admin | Updated: July 10, 2014 01:03 IST