भालचंद्र नांद्रेकर
दानोळी: येथील ग्रामपंचायत निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता वाटत असली तरी जिंकून येण्याची कुवत असूनही उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढणार अशा उमेदवारांची वेगळी मोट बांधणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.
गेल्या निवडणुकीत तालुका काँग्रेस अध्यक्ष सर्जेराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १७ पैकी १६ सदस्य निवडून आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत शरद कारखान्याचे संचालक रावसाहेब भिलवडे होते. पण जिल्हा परिषद निवडणुकीवेळी त्यांची युती विस्कळीत झाली.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिंदे यांची ग्रामविकास आघाडी विरुद्ध माजी बांधकाम सभापती महादेव धनवडे गट, रावसाहेब भिलवडे गट, शिरोळ तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष रामचंद्र शिंदे गट, जनसेवा ग्रुप, राऊत-दळवी गट, शिवसेना तालुकाध्यक्ष सतीश मलमे गट सध्यातरी एकत्र असून यांची नागरिक संघटनेच्या माध्यमातून मुख्य लढत होणार आहे. पण नागरिक संघटनेत अनेक गटनेते एकत्र आल्याने इच्छुक उमेदवारांची संख्याही वाढणार यात शंका नाही.
सतरा जागांसाठी सहा प्रभाग असून मतदार संख्याही मोठी आहे. निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून तरुण वर्ग सक्रिय झाला असून वाड्या, वस्त्या, वाॅर्डात निवडणुकीबाबत बैठका घेतल्या जात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत तरुणांचे श्रेयही मोठे ठरणार असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
ईर्षा आणि प्रतिष्ठेची लढत
गावामध्ये काँग्रेस, स्वाभिमानी आणि शिवसेना या तीन पक्षांचे तालुका अध्यक्ष आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीबरोबर प्रतिष्ठेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. एकहाती सत्ता मिळविण्यासाठी ही लढत काट्याची होणार हे मात्र निश्चित.
सक्षम उमेदवार निवडावा लागणार
निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे गड आला पण सिंह गेला, अशी अवस्था होऊ नये, यासाठी प्रत्येक प्रभागातील उमेदवार हा सक्षम निवडावा लागणार असून मोठी ताकदही लावावी लागणार आहे.