ज्योतिप्रसाद सावंत - आजरा शहरामध्ये जिल्हा परिषदेच्या नागरी सुविधा योजनेंतर्गत बांधण्यात येत असलेले मच्छिमार्केटचे काम गेले दीड वर्ष अपूर्णावस्थेतच असून, तब्बल २५ लाख रुपये खर्चाच्या या मच्छिमार्केटची अवस्था स्मशानशेडसारखी असून, मटण मार्केटप्रमाणेच दुर्दशा सुरू झाली.कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजरा तालुक्यात मासे विक्री मोठ्या प्रमाणात होते. नदीसह समुद्राचे मासे बारमाही आजरा शहरात मिळतात. चित्री व हिरण्यकेशी या बारमाही वाहणाऱ्या नद्या व वेंगुर्ला मालवण येथून समुद्राचे विक्रीसाठी येणारे मुबलक मासे हे यामागाचे प्रमुख कारण आहे.हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन मच्छिप्रेमी नागरिकांची संख्या तालुक्यात प्रचंड आहे. याच पार्श्वभूमीवर १९८५-८६ मध्ये येथील शिवाजीनगर परिसरात मच्छिमार्केट बांधले. तीन वर्षांपूर्वी अचानक रातोरात हे मच्छिमार्केट पाडून येथे जिल्हा परिषदेच्या नागरी सुविधा योजनेंतर्गत नवीन मच्छिमार्केट बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या. सुमारे २५ लाख रुपये खर्चाच्या या मच्छिमार्केट इमारतीचे इ. टेंडर निघाले. पायाखुदाई शुभारंभही झाला. मच्छिविक्रेत्यांमधून समाधान व्यक्त होत होते. प्रत्यक्षात मात्र खरोखरच हे २५ लाख रुपयांचे काम आहे का? असा प्रश्न निर्माण होण्याजोगी परिस्थिती आहे. केवळ भिंती उभारून स्लॅब व पत्रे टाकण्यापलीकडे काहीही काम झालेले नाही. काम अपूर्ण असल्यामुळे मच्छिविक्रेत्यांना आजही उन्हात बसूनच मच्छिविक्री करावी लागत आहे.खासगी गाड्या पार्किंग करणे, कपडे वाळत घालणे यापलीकडे कोणताही वापर या मच्छिमार्केटचा होत नाही, हे वास्तव आहे. संबंधित ठेकेदाराने वाढवून घेतलेली मुदतही संपली आहे. फरशा, शटर्स, वीज, रंगरंगोटी, कठडे याचा काहीच पत्ता नाही. नवीन मच्छिमार्केटपेक्षा जुने होते ते बरे होते, असे म्हणण्याची वेळ आता मच्छिविक्रेत्यांवर आली आहे.शुक्रवारी आठवडा बाजारादिवशी प्रचंड प्रमाणात मासे विक्रीसाठी येतात. माशांची घाण टाकण्यासाठी जागाच नसल्याने शनिवार व रविवारी अंबराई परिसरात दुर्गंधी पसरते. शनिवारी तर दुर्गंधीचा वार समजला जातो.चुकीची जागावास्तविक, मच्छिमार्केट व मटण मार्केट गावाबाहेर असावे, अशी मागणी नागरिकांकडून होत असताना भरवस्तीतच मच्छिमार्केट बांधण्यात आल्याने या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
मच्छिमार्केट की स्मशानशेड ?
By admin | Updated: November 23, 2014 23:54 IST