अमर पाटील : कळंबा
: महानगरपालिकेचा सर्वात शेवटचा प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक ८१, जीवबानाना पार्क हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने या प्रभागातून महापालिकेत जाण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. गतवेळच्या २०१५च्या निवडणुकीत जुन्या सुर्वेनगर प्रभाग आणि क्रांतिसिंह नाना पाटीलनगर प्रभागातील अर्धाभाग समाविष्ट करून प्रभाग ८१, जीवबानाना पार्क प्रभागाची निर्मिती करण्यात आली होती. गतवेळच्या निवडणुकीत हा प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला होता. यंदाच्या निवडणुकीत हा प्रभाग सर्वसाधारण महिला या वर्गासाठी आरक्षित झाला असला तरी आजमितीला दोन डझनांहून जास्त इच्छुक महिला उमेदवार रिंगणात उतरल्याचे चित्र आहे. त्यामुळे उमेदवारी देताना नेत्यांचा मोठा कस लागणार आहे. गतवेळी शिवसेनेच्या अभिजित चव्हाण आणि भाजपच्या संतोष जाधव यांच्यात थेट लढत होऊन शिवसेनेचे अभिजित चव्हाण मोठ्या फरकाने विजयी झाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या योगीता चव्हाण, काँग्रेसचे श्रीनंद कांबळे यांनीही चांगली लढत दिली होती. त्यावेळी तब्बल बारा उमेदवार रिंगणात होते. येथे पक्षीय राजकारणापेक्षा पाटील- महाडिक गटातटाचे राजकारण इर्षेने चालते. त्यामुळे यंदाही या प्रभागात शिवसेनेबरोबरच काँग्रेस, भाजप-ताराराणी आघाडी, राष्ट्रवादी यांच्यात लढत होणार आहे. माजी नगरसेविका मनीषा कुंभार, नगरसेवक अभिजित चव्हाण यांच्या पत्नी तन्वी चव्हाण, सुषमा जाधव, अस्मिता ओटवकर यांच्यासह अन्य तब्बल २५ महिला उमेदवारांनी रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केल्याने या प्रभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
गतनिवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते : अभिजित चव्हाण, शिवसेना- १०८९, संतोष जाधव भाजप- ४७३, योगीता चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस- ३१८, श्रीनंद कांबळे काँग्रेस - ३६४.
प्रभागातील समस्या : १) पाणीपुरवठा करणारा वीस लाख लीटरचा महाकाय जलकुंभ कोरडा २) रस्ते, गटारी, कचरा उठाव प्रश्न गंभीर ३) कमी दाबाने होणारा अपुरा पाणीपुरवठा ४) रस्त्यावरची भाजीमंडई, वाहतूक कोंडी ५) वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण ६) खुल्या आरक्षित जागा विकसित झाल्याच नाहीत ७) प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न प्रलंबित
८) अमर विकास कॉलनी ते कळंबा साठ फुटी डीपी रोड अविकसित ९) नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमणे परिणाम नागरी वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी
सोडवलेले प्रश्न : १) प्रभागातील १५ पैकी तीन आरक्षित जागा विकसित केल्या २) रस्ते गटारी पाणीप्रश्न बहुतांश मार्गी लावला
३) संपूर्ण प्रभागात पथदिवे बसवले ४) प्रभागात ड्रेनेज लाइनचा बहुतांश प्रश्न मार्गी ५) स्वखर्चाने ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठकीसाठी २५ बाकडी बसवली ६) कचरा उठवासाठी कर्मचारी वाढवून आरोग्य प्रश्न मार्गी लावला.
कोट : गेल्या पाच वर्षात चार कोटींची विकासकामे प्रभागात केली आहेत. परिवहन समिती सभापती असताना केएमटीचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. प्रभागाच्या मध्यातून राज्यमार्ग गेल्याने प्रभागाचे दोन मोठे तुकडे झाले आहेत. उंचसखल सहा किलोमीटर विस्तारित प्रभागात तोकड्या विकासनिधीने मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी कसरत करावी लागली, तरीही बहुतांश समस्या मार्गी लावल्या.
अभिजित चव्हाण, नगरसेवक
फोटो १२ प्रभाग क्रमांक ८१
प्रभागात बहुतांश नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमणे झाल्याने ऐन पावसाळ्यात नागरी वस्तीत पाणी शिरते. क्रांतिसिंह नाना पाटील नगरात प्रत्येक पावसाळ्यात नागरी वस्तीत पाणी शिरते.