कोल्हापूर : प्रवर अधीक्षक डाकघर यांच्यातर्फे मंगळवारी (दि. २२) दुपारी ३ वाजता प्रवर अधीक्षक कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी सोमवारी दिली.
पोस्टाच्या सेवेविषयी ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नाही अशा तक्रारींची यात दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत खाते, प्रमाणपत्र, आदी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. संबंधितांनी तक्रार आय. डी. पाटील, प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर - ४१६००३ यांच्या नावे दोन प्रतींसह शुक्रवारपर्यंत पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
----
शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घ्यावा
कोल्हापूर : जिल्ह्यातील नोंदणीकृत सामाजिक संस्था यांनी गरीब शेतकरी, शेतमजूर यांच्या मुलीच्या सामुदायिक विवाहाचे आयोजन करून शुभमंगल सामूहिक, नोंदणीकृत विवाह योजनेचा लाभ घेण्याकरिता २० जानेवारीपर्यंत जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती एस. डी. शिंदे यांनी सोमवारी केले.
या योजनेच्या अनुदानास पात्र ठरण्यासाठी वार्षिक कमाल उत्पन्न मर्यादा १ लाख रुपये राहील. या अंतर्गत मंगळसूत्र व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रती जोडपी १० हजार रुपये एवढे अनुदान दिले जाते. विवाहाचे आयोजन करणाऱ्या संस्थेस दोन हजार रुपये एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान दिले जाते. ही योजना जिल्हा नियोजन विकास समिती मार्फत व त्याची अंमलबजावणी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत केली जाते.
----
इंदुमती गणेश