कोल्हापूर : भूविकास बँकेची इमारत खरेदीचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे प्रलंबित आहे. त्याचा पाठपुरावा करून कर्मचाऱ्यांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
‘भूविकास’ बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमेचा प्रश्न जटील बनला आहे. कर्मचाऱ्यांची देणी भागवण्यासाठी बँकेची मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील इमारत विक्रीला काढली आहे. अनेक वेळा विक्री निविदा प्रसिध्द केल्या; मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा या इमारतीच्या ठिकाणी भक्तिनिवास उभा करण्याचा प्रयत्न आहे. दोन वर्षांपूर्वी तसा प्रस्तावही देवस्थान समितीने विधी व न्याय विभागाकडे पाठविला आहे. मात्र त्यावर काहीच कार्यवाही होत नाही.
कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी पालकंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने केली होती. त्यानुसार सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती. यामध्ये देवस्थान समितीचा प्रलंबित प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, बँकेचे व्यवस्थापक एन. वाय. पाटील, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय साळोखे, एच. एन. पाटील, किरण कारवे, बंडू देशपांडे, श्रीपाद पंडितराव, सुरेश तावडे आदी उपस्थित होते.
सहकार विभागानेच इमारत घ्यावी
मुख्य वस्तीत असूनही इमारतीला मागणी का होत नसेल तर सहकार विभागानेच ही इमारत घेतली तर तिथे सगळी कार्यालये एकत्रित करता येतील, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.