राज्य शासनाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या प्रोत्साहनामुळे हातकणंगले तालुक्यातील शेतकरी व्यापाऱ्यांना केळी न देता स्वत:च विकून अधिक नफा कमवत आहेत. नेजच्या श्री शिवशक्ती शेतकरी मंडळाच्या माध्यमातून इचलकरंजीसह पेठवडगाव, कुंभोज येथील बाजारात शेतकरी ते ग्राहक थेट केळी विक्री केंद्राद्वारे अवघ्या तेरा रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या केळीमुळे ग्राहकालाही फायदा होत आहे. केळी विक्रीच्या या प्रयत्नास ग्राहकांतून वाढता प्रतिसाद मिळत आहे.वारणा नदीकाठावरील कुंभोज, नेज, हिंगणगाव या पट्ट्यात सुमारे ५५0 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली आहे. उसाला कंटाळलेला शेतकरी येथेही केळी दरातील चढ-उतारामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. यास पर्याय शोधताना राज्य शासनाच्या ‘आत्मा’ योजनेचा आधार घेऊन नेज (ता. हातकणंगले) येथील संग्रामसिंह नाईक-निंबाळकर यांनी श्री शिवशक्ती शेतकरी मंडळाच्या छताखाली पन्नास केळी उत्पादक एकत्र आणले. या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कमी दरात केळी देण्यापेक्षा ती माफक दराने थेट ग्राहकांना विकण्याचा निर्णय घेतला.मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारचा मुहूर्त साधून शेतकऱ्यांनी इचलकरंजीत केळी विक्रीचा स्टॉल थाटला. येथील दोन स्टॉलवर मिळून प्रतिदिन एक टन केळीचा खप होत आहे, तर पाठोपाठ कुंभोज व पेठवडगाव येथे सुरू केलेल्या थेट केळी विक्रीला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळू लागला आहे.केळीचा उत्पादन खर्च टनास चार हजार रुपयांपर्यंत होत असताना चालू हंगामात व्यापाऱ्यांकडून खरेदी दर मात्र टनास सरासरी पाच हजार रुपयांपर्यंत गडगडला. परिणामी प्राप्त परिस्थितीत केळी उत्पादनाकडे पाठ न फिरविता स्वत:च्या केळी बाजारात स्वत: विकून अपेक्षित उत्पन्न मिळविण्याचा संग्रामसिंह निंबाळकर, निंबराज निंबाळकर, निशांत कुंभार (नेज), महावीर पाटील, शीलकुमार पाटील, संभाजी मिसाळ (कुंभोज), अमर गुरव (चावरे), अमोल पाटील या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी चंग बांधला आहे. या शेतकऱ्यांच्या धडपडीस हातकणंगलेचे कृषी अधिकारी व्ही. व्ही. देवकर, आत्मा योजनेचे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, तंत्र व्यवस्थापक संदीप देसाई, सहायक व्यवस्थापक धनश्री काटकर यांनी बळ दिले. व्यापारी वगळून होत असलेल्या शेतकरी ते ग्राहकांमधील व्यवहारात केळी उत्पादकास किलोमागे ७ रुपये जादा मिळू लागले आहेत. ग्राहकांनाही बाजारातून डझनावर मिळणाऱ्या केळीपेक्षा शेतकऱ्यांकडून किलोच्या दराने मिळणारी केळी उत्तम प्रतीची, नैसर्गिकपणे पिकविलेली, डझनाच्या हिशेबाने मात्र वजनाने ५ ने ७ रुपयांनी स्वस्त मिळत आहेत. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनीही यातून बोध घेणे गरजेचे आहे.व्यापारी आमच्याकडून सरासरी साडेदहा रुपये किलोने केळी घेतात व डझनावर दुप्पटहून जादा दराने विकतात. यात आमची व ग्राहकांची लूट होते. केळी उत्पादक शेतकरी व ग्राहकांच्या हितासाठी आम्ही पुढाकार घेऊन केळीची थेट ‘आत्मा’च्या मदतीने विक्री सुरू केली आहे.- महावीर जिनगोंडा पाटील,केळी उत्पादक शेतकरी (कुंभोज)शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळवून देणे तसेच ग्राहकांचेही हित साधणे अशा दुहेरी हेतूने शासनाने सुरू केलेल्या ‘आत्मा’ योजनेद्वारे शेतकऱ्यांनी स्वावलंबी आपला शेतमाल आपणास विकण्यास पुढे यावे.- संदीप देसाई, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ‘आत्मा’ योजनावाढता उत्पादन खर्च व केळीस मिळणारा कमी भाव यामुळे केळी उत्पादक आर्थिक संकटात आले आहेत. कृषी विभागाच्या ‘आत्मा’ योजनेने शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट विक्री करण्याचा हक्काचा प्लॅटफॉर्म दिला आहे. यातून शेतकऱ्यांनी प्रगती साधावी.-व्ही. व्ही. देवकर, तालुका कृषी अधिकारी, हातक णंगलेदोघांनाही फायदाकेळीचा उत्पादन खर्च किलोमागे चार रुपये असताना सध्या केळीचा विक्री दर पाच रुपये आहे. यात उत्पादकांना किलोमागे एक रुपया मिळतो. मात्र, थेट ग्राहकांना केळी विकल्याने शेतकऱ्याला किलोमागे ३ ते ५ रुपये मिळत आहेत. दुसरीकडे ग्राहकाला थेट शेतकऱ्यांकडून एक डझन केळी किलोच्या प्रमाणात २0 रुपयाला मिळत आहेत. कारण एक डझन केळीचे वजन जादातर दीड किलो होते. शेतकऱ्यांकडून ७ ते ८ रुपयांत घेतलेली केळी व्यापारी ग्राहकांना १५ ते ३५ रुपयांना देतो.- अशोक खाडे, कुंभोज
‘आत्मा’मुळे केळी शेतातून थेट घरात
By admin | Updated: December 29, 2015 00:44 IST