कोल्हापूर : खासगी भिशीतून दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी कर्जदारास काठीने बेदम मारहाण करण्याचा प्रकार करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथे घडला. याबाबत जखमी प्रदीप दिगंबर पोवार (वय ३३) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पाचजणांवर गुन्हा नोंदविण्यात आला.
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे अशी : ओंकार अरुण पोवार, मयूर बाळासाहेब पोवार, बाबासाहेब रामचंद्र कांबळे, अनुप अरुण पोवार, बाबासाहेब आनंदा पोवार (सर्व रा. निगवे दुमाला, ता. करवीर).
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी प्रदीप पोवार आणि संशयित सर्वजण हे निगवे गावचे रहिवासी आहेत. संशयितांपैकी मयूर पोवार हा खासगी भिशीचा खजानीस आहे; तर अनुप व बाबासाहेब हे दोघे भिशीचे सदस्य आहेत. प्रदीप पोवार यांनी भिशीतून जून २०२० मध्ये तीन टक्के व्याजदराने ३० हजार रुपये कर्ज घेतले. त्यांनी १० महिन्यांचे व्याज नऊ हजार रुपये व मुद्दलीचे ३० हजार रुपये मार्च २०२१ मध्ये मयूरकडे दिले. तरीही मुद्दल २१ हजार रुपये व्याजाच्या रकमेच्या वसुलीच्या उद्देशाने संशयित मयूरने त्यांना सोमवारी (दि. २६) रात्री घराबाहेर बोलावून घेतले. त्यावेळी शाब्दिक वाद वाढत जाऊन पाचही जणांनी त्यांना काठीने बेदम मारहाण केली. त्यामध्ये ते जखमी झाले. याबाबत प्रदीप पोवार यांनी करवीर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री रीतसर तक्रार दाखल केली. त्यानुसार ओंकार पोवार, मयूर पोवार, बाबासाहेब कांबळे, अनुप पोवार, बाबासाहेब पोवार यांच्यावर मारहाणीचा तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.