कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाचे सन २०१४-२०१५ ते २०१९-२०२० या कालावधीचे विशेष विशेष लेखापरीक्षण करून घेण्याचा निर्णय प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंगळवार घेतला. याबाबत त्यांनी राज्य शासनाच्या स्थानिक निधी लेखापरीक्षण विभागाच्या संचालकांना पत्र पाठवून आपल्या विभागातर्फे पथक नेमून लवकरात लवकर विशेष लेखापरीक्षण करून मिळावे म्हणून पत्र पाठविले आहे.
महानगरपालिका घरफाळा विभागात गेल्या काही वर्षांत अनेक घोटाळे झाले असून, त्याबाबत जाहीर आरोप झाले आहेत. काही सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी त्यासंबंधीचे लेखी पुरावे सादर केले. त्याअनुषंगाने काही प्रकरणांची चौकशी झाली. त्यात दोषी असणारे तत्कालीन कर निर्धारक दिवाकर कारंडे यांच्यासह दोन अधीक्षक, एक लिपिक यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत.
तथापि घोटाळ्याचे प्रकरण तिथेच थांबलेले नाही तर, माजी उपमहापौर भूपाल शेटे व माजी नगरसेवक जयंत पाटील यांनी आणखी काही पुराव्यासह भ्रष्टाचाराची प्रकरणे प्रशासनाकडे सादर केली आहेत. परंतु त्यावर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. चौकशीचा अहवाल तयार नाही. चौकशी कामी संबंधित कर्मचारी सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे कारवाई कोणावर आणि कोणती करावी, असा प्रश्न प्रशासनासमोर आहे.
त्यामुळे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी घरफाळ्यातील घोटाळेबाजांना चांगलाच झटका दिला. ही चौकशी स्थानिक अधिकाऱ्यांकडून लवकर होणार नाही, तसेच घोटाळेबाजावर कारवाईही होणार नाही, हे लक्षात येताच प्रशासकांनी राज्य शासनाच्या स्थानिक निधी लेखापरीक्षण विभागाच्या संचालकांना पत्र पाठवून विशेष पथकामार्फत लवकरात लवकर विशेष लेखापरीक्षण करून मिळावे म्हणून पत्र पाठविले आहे.
विशेष लेखापरीक्षण होण्यास काही कालावधी जाणार असला तरी स्थानिक निधी लेखापरीक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ते नि:पक्षपाती होईल. संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात प्रशासनास अधिक सोयीचे होईल, अशी अपेक्षा आहे.
किचकट चौकशी, हतबल अधिकारी
घरफाळा विभागातील कर आकारणीची पद्धत ही अतिशय किचकट आणि डोकेदुखीची आहे. त्यामुळे त्यातील घोटाळे झाले आहेत किंवा नाही हे या विषयाशी संबंधित अधिकारीच शोधू शकतात. अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्यासारख्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दैनंदिन कामातून त्याकडे लक्ष देणे केवळ अशक्य आहे. लेखापरीक्षण विभागातील अधिकारीच त्याचे प्रकरणे शोधून काढतील.