लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : येथील कैकाडी गल्ली परिसरात जमिनीच्या वादातून सख्या भाऊ व पुतण्याने काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रकार रविवारी सायंकाळी घडला. जखमी वृद्धाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
भीमराव शंकर जाधव (७०, रा. कैकाडी गल्ली, पेठवडगाव) असे मृताचे नाव आहे. त्यांचे कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
या हल्ल्यात मृत भीमराव जाधव यांची पत्नी रुक्मिणी जाधव (६५), मुलगा रणजीत जाधव (४०) हे दोघेही जखमी झाले. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कैकाडी गल्लीत भीमराव व अशोक हे सख्खे भाऊ समोरासमोर राहतात. गेले काही दिवस त्या दोघा भावांत जागेवरून वाद धुमसत आहे. रविवारी सायंकाळी भीमराव जाधव हे दारात पाणी मारत होते. त्यावेळी ते पाणी अशोकच्या घराच्या भिंतीवर उडाल्याचे निमित्त झाले व दोघांत वाद सुरू झाला. यावेळी अशोक जाधव व त्याचा मुलगा प्रवीण जाधव या दोघांनी भीमराव जाधव, त्यांची पत्नी रुक्मिणी व मुलगा रणजीत यांना काठी, दगड, विटांनी तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप रणजीत जाधव यांनी केला.
या मारहाणीनंतर भीमराव यांची प्रकृती बिघडली.
त्यांना तातडीने उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात तातडीने नेऊन दाखल केले; पण उपचारापूर्वीच भीमराव यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृत भीमराव हे वीज वितरण कंपनीत नोकरीला होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे, तर त्यांचा मुलगा रणजित हा वीज वितरण कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून कुरुंदवाड येथे कार्यरत आहे. दरम्यान, रात्री
उशिरापर्यंत सीपीआर येथे रणजीत यांचे नातेवाईक व मित्रांनी गर्दी केली होती, तर याप्रकरणी तपास व चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत वडगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद घेण्याचे काम सुरू होते.