गडहिंग्लज : राज्यसभेत कोणत्याही प्रकारची चर्चा न करता कृषीविषयक कायदे पारित करून मोदी सरकारने राज्यघटनेलाच हरताळ फासला आहे, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज, शनिवारी केली.
शेतकरीविरोधी कायद्यांच्या निषेधार्थ आणि दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ‘सलोखा परिषदे’तर्फे येथील प्रांतकचेरीसमोर आयोजित सर्वपक्षीय धरणे आंदोलनात ते बोलत होते. एकदा गुजरातमधून, एकदा आंध्रातून ‘मन की बात’मधून बोलणाऱ्या पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांशी बोलायला मात्र अपमान वाटत आहे, असा टोला लगावत त्यांनी आंदोलनाला पाठिंबाही दिला.
कॉ. संपत देसाई म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह लोकांनी उभारलेल्या सर्व संस्था, पर्यायाने लोकशाहीच मोडीत काढण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. तो हाणून पाडला पाहिजे.
यावेळी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी, काँग्रेसचे प्रा. किसनराव कुराडे, ‘स्वाभिमानी’चे राजेंद्र गड्यान्नावर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सिद्धार्थ बन्ने, कॉ. शिवाजी गुरव, मनोहर दावणे यांचीही भाषणे झाली.
आंदोलनात नगरसेविका सुनीता पाटील, शशिकला देसाई, शकुंतला हातरोटे, ॲड. नाज खलिफा व क्रांती शिवणे, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, उदय कदम, रमेश मगदूम, बसवराज मुत्नाळे, सखी महिला मंडळाच्या कॉ. उज्ज्वला दळवी, उर्मिला कदम, ‘दानिविप’चे रमजान अत्तार, ‘वंचित’चे सुरेश थरकार, साताप्पा कांबळे, रफीक पटेल, परशुराम कांबळे, आदींसह कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद बारदेस्कर यांनी आभार मानले.
--- गडहिंग्लज येथील प्रांतकचेरीसमोर सलोखा परिषदेच्यावतीने आयोजित सर्वपक्षीय आंदोलनात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार श्रीपतराव शिंदे, संपत देसाई, बाळेश नाईक, अरविंद बारदेस्कर, सिद्धार्थ बन्ने, महेश सलवादे, गुंड्या पाटील, आदी उपस्थित होते. (किल्लेदार फोटो )
चौकट
दया दाखवा, आंदोलन संपवा..! केवळ रक्तच नव्हे, तर हाडं गोठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीतदेखील शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर दया दाखवावी, त्यांच्या मागण्या मान्य करून आंदोलन त्वरित संपवावे, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.
-------
किसान सन्मानपेक्षा चौपट लाभ..! ‘किसान सन्मान योजने’त महिन्याला पाचशेप्रमाणे शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार मिळतात. ‘केडीसीसीद बँकेकडून आपण ३ लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देणार आहोत. शेतकऱ्यांनी ही रक्कम बँकेत ठेवल्यास त्याच्या व्याजाची रक्कम पंतप्रधान मोदींच्या किसान सन्मान रकमेपेक्षा चौपट होते,असेही मुश्रीफ यांनी सांगितले.