बऱ्याच वेळा असं घडतं की, माणूस एकापाठोपाठ एक संकटे येतात तेव्हा पुरता गळतो. मानसिकदृष्ट्या खचतो. संकटांशी आपण मुकाबला करू शकत नाही, अशी त्याची भावना होते. तो स्वत:च ठरवून टाकतो. आपण आता संपलो. नव्याने उभा राहू शकत नाही, असा त्याचा विचार पक्का होताे. खरं तर ही पराभूत मानसिकता आहे. जेव्हा अशी मानसिकता तयार होते, तेव्हा त्या व्यक्तीचा पराभव होतो, संकटाचा विजय होतो; परंतु जो माणूस मोठ्या संकटावरही मात करण्याचा निश्चय करतो, तेथे संकटाने मान टाकलेली असते. संकटापुढे हार पत्करणाऱ्या माणसांपेक्षा त्यावर मात करणाऱ्यांची संख्या समाजात जास्त आहे.
अडचणी नाहीत, समस्या नाहीत, संकटे नाहीत असा माणूस तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. जर सापडलाच तर अशा माणसाच्या जीवनात जगण्याची मजाच असणार नाही. अडचणी, समस्या आहेत म्हणूनच माणसाचे आयुष्य उजळते. तुमच्या ताटात पंचपक्वान्ने आहेत; पण त्यांत मीठच नसेल तर त्याला चव असणार नाही. म्हणूनच संकटं, समस्या या मिठासारख्या असल्या तरी त्यामुळे जीवनातील गोडवा वाढतो, हे वास्तव आहे.
गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण देशावर कोरोनासारख्या महामारीचे संकट आहे. ही महामारी मानवजातीच्या जिवावरच उठली. एकीकडे संसर्ग वाढू नये म्हणून जाहीर झालेला लॉकडाऊन आणि दुसरीकडे संपूर्ण देश घरात बसून राहिल्यामुळे निर्माण झालेल्या रोजगाराच्या अडचणी यांमुळे खाण्यापिण्याचेही हाल झाले. कोरोना महामारीच्या काळात गोरगरीब, सर्वसामान्य व्यक्तींवर जशी संकटे आली तशी ती मोठमोठ्या व्यापारी, उद्योजकांवर आली. सामान्य कष्टकऱ्यांचा जसा रोजगार बुडाला तशा मध्यमवर्गीय नोकरदारांच्या नोकऱ्याही गेल्या. संपूर्ण देश बंद झाला होता. सर्वत्र केवळ शुकशुकाट, भीती होती. प्रत्येक व्यक्तीसमोर पोट कसं भरायचं हीच एकमेव चिंता होती.
संपूर्ण जग एका भयाण वातावरणात कठीण मार्गावरून चालले होते. प्रत्येकासमोर अंधार होता. काय होणार, कसं होणार, जगणार की मरणार अशा अनेक शंका-कुशंकांनी प्रत्येकाला ग्रासले होते. जवळची शिल्लक संपली. उसनवारीही झाली. आता काय करायचं या विवंचनेत प्रत्येक व्यक्ती होतीच; पण या जागतिक महामारीवरही या देशातील करोडो लोकांनी मात केली. या अभूतपूर्व संकटावर मात करण्याची प्रत्येकाची धडपड होती. ‘हरायचं नाही, केवळ लढायचं’ अशी मानसिकता प्रत्येकाने केली आणि तेथून खऱ्या अर्थाने कोरोनाविरुद्धची लढाई सुरू झाली. एकाने सुरुवात केल्यावर दुसऱ्यांना बळ मिळत गेलं. संकटावर उभे राहण्याचा मार्ग ओळखता आला. त्याच्यावरून वाटचाल सुरू झाली.
रोजगार, नोकऱ्या गेल्यामुळे जगण्यासाठी काहीतरी केलेच पाहिजे यासाठी प्रत्येक जण धडपडायला लागला. कोरोनाच्या काळात मास्क, सॅनिटायझर, साबण, हँडग्लोव्हज, पीपीई किट, जंतुशाशक औषधे यांची समाजाला असणारी गरज ओळखून अनेकांनी आपल्या रोजगाराच्या नव्या वाटा शोधून कोणी मास्क बनविण्याचे, कोणी सॅनिटायझर तयार करण्याचे, कोणी सॅनिटायझरचे कॅन, बाटल्या तयार करण्याचे रोजगार सुरू केले. कोणी धान्याचे किट बनवून देण्याचा व्यवसाय सुरू केला. कोणी पीपीई किट तयार करून देण्यास सुरुवात केली. कोणी आपल्या हातच्या चवीला बाजारपेठ मिळवून देण्यास सुरुवात केली, तर कोणी भाजी विक्री करून नवा व्यवसाय चालविला. महामारीत ऑनलाईन युग निर्माण झाल्यामुळे कोणी ऑनलाईन योगा वर्ग सुरू केले. कोणी ऑनलाईन कुकिंग क्लासेस सुरू केले. ‘रडायचं नाही, फक्त लढायचं’ ही भूमिका प्रत्येकाने स्वीकारली.