संदीप बावचे -जयसिंगपूर -शिरोळ तालुक्यात पुन्हा घरगुती गॅस सिलिंडरचा बेकायदेशीर वापर होत असल्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यात हॉटेल, ढाबे याठिकाणी या सिलिंडरचा सर्रास वापर होत आहे.महसूल विभागातील पुरवठा विभागातून वर्षातून एकदाच कारवाई केली जाते. एकीकडे सिलिंडर वेळेत मिळत नाहीत म्हणून ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो, तर दुसरीकडे बेकायदेशीर घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याने ग्राहकातून संताप व्यक्त केला जात आहे. शिरोळ तालुक्यात साठ हजाराहून अधिक घरगुती गॅस सिलिंडर ग्राहक आहेत. जयसिंगपूर येथे दोन, कुरूंदवाड दोन, शिरोळ एक, शिरढोण एक, शिरदवाड एक, टाकवडे एक असे एकूण आठ गॅस वितरक आहेत. या एजन्सीधारकांकडून तालुक्यात गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो. कंपनीने घालून दिलेल्या नियमानुसार सिलिंडर मिळण्यासाठी मोबाईल क्रमांकावर ग्राहकांकडून बुकिंग केले जाते. मात्र, काही एजन्सीधारकांकडून सिलिंडर देण्यास विलंब होतो. शिवाय घरपोच सिलिंडर सेवा देण्याबाबतही ग्राहकांकडून तक्रारी आहेत. ग्रामीण भागातील काही ग्राहक पहाटेपासूनच सिलिंडर नेण्यासाठी एजन्सीधारकांच्या कार्यालयासमोर येवून थांबल्याचे चित्र दिसत आहे. अशा समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागत असताना घरगुती गॅस सिलिंडरचा बेकायदेशीर वापर होत असल्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हॉटेल, ढाबे याठिकाणी सर्रास सिलिंडरचा वापर केला जात आहे. वाहनांमध्ये याच गॅसचा वापर काहीजणांकडून सुरू असून, जादा पैसे मिळविण्याच्या लालसेतून लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होतो. अशाप्रकारे बेकायदेशीरपणे घरगुती वापराचा गॅस सिलिंडर टाक्यांमध्ये इलेक्ट्रीक मोटारीच्या साहाय्याने भरला जात आहे. कारवाई होणार का ?बेकायदेशीर घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुरवठा विभागाबरोबरच पोलीस खात्याच्या पथकाकडून या प्रकाराची कितपत गंभीर दखल घेतली जाते, यावरच कारवाई अवलंबून राहणार आहे.पुन्हा एनओसी दाखल करण्यासंबंधी मेसेजगॅस सिलिंडर ग्राहकांना पुन्हा एनओसी कागदपत्रे गॅस एजन्सीकडे दाखल करण्यासंबंधीचे मेसेज मोबाईलवर येत आहेत. एक वर्षापूर्वी सर्व कागदपत्रे जमा करण्यात आले असताना पुन्हा कागदपत्रांची मागणी होत असल्यामुळे ग्राहकांतून संताप व्यक्त होत आहे. जयसिंगपूर केंद्रबेकायदेशीर घरगुती गॅस सिलिंडर टाक्यामध्ये भरणारी यंत्रणा जयसिंगपुरात मोठ्या प्रमाणात कार्यरत झाली आहे. इलेक्ट्रीक मोटारीच्या सहाय्याने हा गॅस वाहनांमध्ये भरला जातो. अजिंक्यतारा सोसायटी येथे खुलेआमपणे हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. यावर नियंत्रण कोण ठेवणार, असा प्रश्न गॅस ग्राहकांतून उपस्थित केला जात आहे.
शिरोळमध्ये बेकायदेशीर सिलिंडरचा प्रश्न ऐरणीवर
By admin | Updated: November 30, 2014 23:57 IST