कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि या परिसरात शिस्त निर्माण होण्याच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यामध्ये मंदिराच्या दक्षिण आणि पूर्व दरवाजापासून १०० मीटर, तर उत्तर आणि पश्चिम दरवाजापासून ५० मीटर अंतर हे ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून घोषित करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने मंगळवारी घेतला. राष्ट्रीय शहर फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त पी. शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली शहर फेरीवाला समितीची बैठक झाली. यावेळी फेरीवाल्यांचे पुनर्वसनाबाबत ठोस निर्णय घेण्यात आले. रेल्वे फाटक येथील भाजी मंडईच्या जागेमध्ये फेरसर्वेक्षण करून या ठिकाणी या भाजी विक्रेत्यांबरोबरच मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे शक्य आहे काय? याबाबत पाहणी करून निर्णय घेण्याचे ठरले. जे फेरीवाले विचारे कॉम्प्लेक्समधील गाळ्यांमध्ये व्यवसाय करणार आहेत, अशा गाळेधारकांच्या व्यवसायवृद्धीच्या दृष्टिकोनातून मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून या रस्त्याला जोडणारा मार्ग राज्य परिवहन महामंडळाच्या कंपाउंडमधून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाजी पुतळा येथील हटविण्यात आलेल्या फळविक्रेत्यांना शिवाजी मार्केटच्या पार्किंग एरियामध्ये विशिष्ट क्षेत्र निश्चित करून त्यांचे पुनर्वसन करण्याचे बैठकीत ठरले. अंबाबाई मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून विकास करण्यात येणार आहे. या परिसरातील बेकायदेशीर व्यावसायिक, फेरीवाले आणि मंजूर बांधकामातील पार्किंगमध्ये असणारे व्यवसाय, यांची तपासणी करण्यात येत असून, त्याची यादी तयार करून त्यावर कारवाई करण्याचे ठरले. यामुळे मंदिर परिसरात शिस्त निर्माण होऊन सुरक्षाव्यवस्था सुद्धा सक्षम करता येणार आहे. त्यादृष्टीने मंदिर परिसर ‘नो फेरीवाला झोन’ करण्याबाबत एकमत झाले. बैठकीसाठी इस्टेट मॅनेजर संजय भोसले यांच्यासह फेरीवाले संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)...अन्यथा त्यांची ओळखपत्रे रद्द करणारशहरात एकूण ८६०० फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाले असून, ५४०० अर्जदारांची ओळखपत्रे तयार करण्यात आली आहेत. २९०० ओळखपत्रांचे वाटप झाले असून, २३०० ओळखपत्रे अद्याप फेरीवाल्यांनी स्वीकारलेली नाहीत. अशा फेरीवाल्यांना १५ दिवसांची मुदत देण्याचे ठरले असून, या मुदतीत जे फेरीवाले आपली ओळखपत्रे स्वीकारणार नाहीत, त्यांची ओळखपत्रे रद्द करण्याचे ठरले आहे.
‘अंबाबाई’ फेरीवालामुक्त क्षेत्र
By admin | Updated: July 15, 2015 01:17 IST