भीमगोंडा देसाई- कोल्हापूर -अपंग वर किंवा वधू यांच्याशी सुदृढ व्यक्तीने लग्न केल्यास ५० हजारांचा लाभ (आहेर) विविध स्वरूपांतून दिला जात आहे. शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. लाभासाठी जिल्ह्यातील ११ जोडप्यांनी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे अर्ज केले आहेत.जन्मत:च अपंग असणाऱ्या व्यक्तीला दैनंदिन जीवनात क्षणाक्षणाला संघर्ष करावा लागतो. धावपळीच्या युगात अपंग व्यक्तीचं जगणं असह्य होतं. जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत अनेक कामांत आई-वडील मदत करीत असतात. अलीकडे शासन अपंगांचे जीवन सुसह्य करण्यासाठी नोकरीत आरक्षण देत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासकीय कार्यालयांमध्ये अपंगांना जाता यावे यासाठी रॅम्प तयार केले आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिळाली तर नोकरी किंवा जमेल तो व्यवसाय करण्यास तो सुरुवात करतो. अपंग वधूला वर, तर वराला वधू मिळत नाही. लग्न जमविताना संबंधितांचे आई-वडील मेटाकुटीस येत असतात. सुदृढ कोणीही सहजपणे अपंगाशी विवाह करण्यास तयार होत नाहीत. परिणामी जोडीदार मिळविण्यातच लग्नाचे वय ओसरून जाते. परिणामी संबंधितास कौटुंबिक जीवनाचा आनंद घेता येत नाही. ४० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या वधू किंवा वराशी सुदृढाने लग्न केल्यास शासनाकडून ५० हजार रुपयांचा लाभ (आहेर) म्हणून जून २०१४ पासून दिला जात आहे. २५ हजार रुपयांचे बचतपत्र, २० हजार रुपये रोख, ४ हजार ५०० रुपयांचे संसारोपयोगी साहित्य व वस्तू खरेदीसाठी देण्यात येणार आहे. पाचशे रुपये स्वागत समारंभाच्या खर्चासाठी असे लाभाचे स्वरूप आहे. लाभासाठी १ एप्रिल २०१४ नंतर विवाह झालेला असावा, वधू अथवा वरांकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्वाचा दाखला असावा, विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक , विवाह एक वर्षाच्या आत झालेला असावा, असे निकष आहेत. इतकी कागदपत्रे घेऊन जिल्हा परिषद समाजकल्याणकडे अर्ज करणे गरजेचे आहे. छाननीत पात्र अर्जदारास लाभ देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.
अपंगाशी विवाह करणाऱ्यास ‘आहेर’
By admin | Updated: January 2, 2015 00:17 IST