बोरवडे : सोनाळी (ता. कागल) येथील दुरवस्था झालेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या तलावाची पाहणी जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. पावसाळ्यानंतर आपल्या खात्यामार्फत तलावातील गाळ काढण्याचे आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी सोनाळी ग्रामस्थांना दिले. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.सन १९७२ च्या दुष्काळी परिस्थितीवेळी हा तलाव बांधण्यात आला. ७८ एकर परिसरात तलावाचे क्षेत्र आहे. तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाणी साठा कमी होत चालला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. मंत्री मुश्रीफ यांनी शुक्रवारी या तलावाची पाहणी केली. दूधगंगा नदीतील पाणी तलावात सोडले जात असून, यासाठी नागनाथ पाणीपुरवठा संस्थेचे वीज कनेक्शन वापरले जात आहे. त्यामुळे या संस्थेचे वीज बिल व नोकरांचा पगार शासनाने अदा करावा, असा आदेश मुश्रीफ यांनी तहसीलदार शांताराम सांगडे यांना दिला.ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी गावात पाच बोअरवेल तत्काळ मारावेत, असा आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना मुश्रीफ यांनी दिला. यावेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक डी. आर. जाखे, गटविकास अधिकारी चंद्रकांत वाघमारे, तहसीलदार शांताराम सांगडे, डी. एम. चौगले, सागर पार्टे, एन. बी. भोई, शिवाजी खुळांबे, अशोक चौगले, भीमराव मस्कर, अर्जुन खुळांबे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सोनाळी तलावातील गाळ पावसाळ्यानंतर काढणार
By admin | Updated: July 14, 2014 01:01 IST