अतुल आंबी- इचलकरंजी -शहर व परिसरात अवैध व्यवसायांच्या सुळसुळाटाबरोबरच बनावट निर्मितीही पोलीस दलासह प्रशासनाला आव्हान देणारी ठरत आहे. जुन्या चंदूर रोडवरील गुटखा कारखाना, कोंडिग्रेमधील गुटखा कारखाना यापाठोपाठ कोरोचीतील बनावट दारू निर्मिती कारखाना या प्रकरणांमुळे हा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभाग, पोलीस दल, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि प्रशासन हे एकमेकांकडे बोट दाखवून हात झटकत आहेत. त्यामुळे अशा व्यावसायिकांचे चांगलेच फावते. तसेच याबाबत असलेली कायद्यातील कमकुवत तरतूदही याला काही प्रमाणात कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे अशा कायद्याच्या पळवाटा शोधून हे अवैध व्यावसायिक निवांतपणे सुटत आहेत आणि पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या...’ त्यामुळे याबाबत काहीतरी ठोस उपाययोजना प्रशासनाकडूनच होणे आवश्यक आहे. प्रशासनाने संबंधित विभागांना काटेकोरे अंमलबजावणीची सक्ती केल्यास यावर काही प्रमाणात अंकुश ठेवता येईल. या प्रकरणानंतरही प्रशासनाने दुर्लक्षित भूमिका ठेवल्यास, अशा अवैध व बनावटगिरी करणाऱ्या व्यावसायिकांचा सुळसुळाट होईल.गेल्या दीड वर्षात जुन्या चंदूर रोडवर असलेल्या ‘आर्यन’ या बनावट गुटख्याची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी दोनवेळा छापा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल व मशिनरी जप्त केली. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथेही विविध कंपन्यांचा बनावट गुटखा निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर छापा टाकून पोलिसांनी लाखो रुपयांचे मुद्देमाल व मशिनरी जप्त केली.अवैध व बनावट गुटखा निर्मितीचे केंद्र म्हणून इचलकरंजी परिसराची बदनामी सुरू असतानाच कोरोची गावात देशी-विदेशी बनावट दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या कारखान्यांवर कोल्हापूर उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून ते उद्ध्वस्त केले. या कारखान्यात बाटल्या, लेबल व बॉक्स यांची हुबेहूब नक्कल करून विक्री केली जात होती. या प्रकरणांमुळे पुन्हा इचलकरंजीचे नाव अवैध स्वरूपात चांगलेच गाजत आहे. त्यामुळे शहर व परिसरात असे अन्य कोणते अवैध व बनावट निर्मिती करणारे व्यवसाय सुरू आहेत का, यावर नेमके नियंत्रण कोणत्या विभागाने ठेवावे, यासाठी प्रशासनाने बैठक घेऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्य अवैध व्यवसायांवरही कारवाई करावीप्रशासनाने बनावट निर्मितीसह अवैध व्यवसाय, व्हिडिओ गेमच्या नावाखाली सुरू असलेली आॅनलाईन मटका केंद्रे, जुगार अड्डे, गावठी दारूअड्डे, क्लब, फेरीवाल्यांच्या गाड्यांवर सुरू असलेले ओपन बार यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.प्रकरणांच्या मुळाशीजाणे आवश्यकअशा अवैध व्यावसायिकांवर कारवाई केल्यानंतर त्याचा पाठपुरावा करणे व अशा प्रकरणांच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित विभाग कारवाईनंतर दुसऱ्याच कामात गुंततो आणि या प्रकरणांच्या मुळाशी जाणे राहून जाते.सीमाभागाचा गैरफायदाइचलकरंजी शहरालगतच कर्नाटक सीमाभाग असल्याने याचाही या अवैध व्यावसायिकांना मोठा फायदा होत आहे. अवैध निर्मितीसाठी लागणारे साहित्य, रसायने सीमाभागातून आणून त्यापासून निर्मिती करणे व शहर परिसरासह सीमाभागातही विक्री करणे, असा उपद्व्याप या व्यावसायिकांचा सुरू असतो.
गुटख्यापाठोपाठ आता बनावट दारू निर्मितीही
By admin | Updated: December 29, 2015 01:08 IST