कोल्हापूर : महानगरपालिका सेवेतील संजय भोसले पूर्वपरवानगी न घेता पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमासमोर महानगरपालिका प्रशासनाच्या विरुद्ध माहिती देऊन प्रशासनाची बदनामी करीत आहेत. या प्रकाराना आळा घालावा, तसेच गैरवर्तन केले म्हणून भोसले यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे मंगळवारी केली.
संजय भोसले सहायक आयुक्त विनायक औंधकर यांचा अनादर होईल, असे जाहीरपणे बोलत आहे. प्रशासकांकडून कारवाई होणार आहे. म्हणूनच अशी कारवाई होऊ नये यासाठी संजय भोसले महानगरपालिका अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करीत आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ मधील नियम क्रमांक ६ प्रमाणे आयुक्त यांच्या परवानगीशिवाय वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन यांच्याशी संपर्क ठेवण्यास प्रतिबंध असताना या नियमाचे संजय भोसले यांच्याकडून उल्लंघन होत आहे. म्हणूनच याचा तत्काळ बंदोबस्त केला पाहिजे, असे शेटे यांनी म्हटले आहे.