कोल्हापूर : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने आज, बुधवारी कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक व पार्सल विभागात छापा टाकून चौघांकडून सुमारे ६४ हजार ८00 रुपये किमतीचा २३२ किलो खवा व स्पेशल बर्फीचा साठा जप्त केला. गणेशोत्सवासाठी पुणे शहर व उस्मानाबाद जिल्ह्यातून आरोग्यास हानिकारक वातावरणात वाहतूक करून स्पेशल बर्फी व खव्याचा साठा कोल्हापुरात विक्रीसाठी येणार असल्याचे सूत्रांकडून कळले होते. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाळत ठेवून आज, बुधवारी छापा टाकला. यात नारायण बाबूराव बिक्कड (रा. उचगाव. ता. करवीर) यांच्याकडून ८ हजार २५० किमतीचा ५५ किलो, शिवानंद शिवलिंग शेलार (रा. अंबाई टँक) यांच्याकडून २२ हजार ३५० रुपये किमतीचा १४९ किलो, दीपक राम कवड (रा. कोरगावकर कॉलनी, शिरोली, ता. हातकणंगले)े यांच्याकडून २ हजार ८५० रुपये किमतीचा १९ किलो, तर धनंजय दत्तात्रय कोळी, (रा. १४७१, सी वॉर्ड, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी) यांच्याकडून ३१ हजार ३५० रुपये किमतीचा २०९ किलो खवा जप्त केला. प्रयोगशाळेत खव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले असून अहवालानंतर या विक्रेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन, कोल्हापूरचे सहायक आयुक्त सं. मा. देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात ६५ हजारांचा खवा जप्त
By admin | Updated: September 4, 2014 00:22 IST