कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या वर्ग-३ व वर्ग-४ च्या १९४ जागांसाठी तब्बल १८ हजार ३५८ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. आज, बुधवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने जिल्हा परिषदेमध्ये इच्छुकांची एकच गर्दी उसळली होती. सर्वाधिक अर्ज परिचर पदासाठी आठ हजार ४६० इतके दाखल झाले आहेत. जिल्हा परिषदेने वर्ग-३ व वर्ग-४ मधील सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू केली होती. कनिष्ठ अभियंता, आरोग्यसेवक यांसह विविध विभागांतील रिक्त १९४ पदांची जम्बो भरती केली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. त्यानुसार गेले दहा दिवस प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. काही अर्ज पोस्टाने दाखल झाले आहेत, तर बहुतांशी जणांनी प्रत्यक्ष येऊनच अर्ज दाखल केल्याने गर्दी उसळली होती. आज अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असल्याने सायंकाळी सहापर्यंत इच्छुकांनी गर्दी केली होती. या सर्व जागांमध्ये महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालीन, अपंग यासाठी राखीव जागा आहेत. या सर्व जागांसाठी २ नोव्हेंबर २०१४ पासून लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)विभागनिहाय जागा, कंसात आलेले अर्ज कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - ५ (२६४), आरोग्यसेवक (महिला)- ३१ (११००), शिक्षण विस्तार अधिकारी- २ (५३१), पर्यवेक्षिका (महिला) - १ (५२३), वरिष्ठ साहाय्यक (लेखा) - २ (३९९), औषध निर्माण अधिकारी - २ (१२१), आरोग्यसेवक (पुरुष) - १३ (२१४), कनिष्ठ आरेखक - ६ (१०७)कंत्राटी ग्रामसेवक - ५३ (४७३२), स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक - ३० (९२८), वरिष्ठ साहाय्यक (लिपिक) - २ (३२५), परिचर - ४३ (८४६०), कनिष्ठ साहाय्यक - २ (२०८), कनिष्ठ लेखाधिकारी - १ (४३)
कोल्हापूर १९४ जागांसाठी अठरा हजार अर्ज
By admin | Updated: September 4, 2014 00:17 IST