अतुल आंबी - इचलकरंजी --पंचगंगा नदीकाठच्या गांधीनगर ते नृसिंहवाडी या परिसरातील ५७ गावांमधील १२३२५.२२ हेक्टर क्षेत्राला सध्या पंचगंगा नदीतील रासायनिकयुक्त प्रदूषित पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे पिके ही कमी प्रतीची उत्पादित होत आहेत. दूषित पाणी व औषध फवारणी केलेली पिके, फळभाज्या खाल्ल्याने दिवसेंदिवस नागरिकांना वेगवेगळ््या आजारांना सामोरे जावे लागत आहे. तरीही शासन डोळे मिटून गप्प आहे. पंचगंगा नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र २५८२ चौ.कि.मी. आहे. तर नदीखोऱ्यात एकूण लागवडीयुक्त क्षेत्र चार लाख ८२ हजार हेक्टर व लागवडीखालील क्षेत्र तीन लाख ७१ हजार ८२८ हेक्टर इतके आहे. त्यातील गांधीनगर ते नृसिंहवाडी या काठावर रुकडी पाटबंधारे विभागांतर्गत ३५२३.८० हेक्टर, इचलकरंजी ४९१७.४२, तर कुरुंदवाड ३८८४.०० हेक्टर असे एकूण १२३२५.२२ हेक्टर क्षेत्राला पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये शिरोली, नागाव, मौजे वडगाव, हालोंडी, गांधीनगर, मालेवाडी, मुडशिंगी, रुकडी, अतिग्रे, पट्टणकोडोली, तिळवणी, माणगाव, हातकणंगले, करवीर, वसगडे, सांगवडे, चिंचवाड, गडमुडशिंगी, जठारवाडी, रुई, कबनूर, चंदूर, अब्दुललाट, शिरदवाड, शिरढोण, नांदणी, कुरुंदवाड, शिरोळ अशा ५७ गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये प्रामुख्याने ऊस पीक असले, तरी अनेक गावांमध्ये हंगामी आंतरपिके गहू, खपली, भुईमूग, भात यासह टोमॅटो, कोबी व अनेक प्रकारच्या भाजीपाल्यांचे उत्पादन केले जाते.या नदीच्या पाण्यावर शेती करून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्नात भर घातली आहे. गावांसह शहरातील लोकांनाही भाजीपाला व धान्यांचा पुरवठा केला. मात्र, पंचगंगा प्रदूषणामुळे दूषित पाणी या पिकांना द्यावे लागत आहे. परिणामी, पीकही तशा प्रतीचेच उत्पादित होत आहे. अनेक ठिकाणी दूषित पाण्यामुळे भाजीपाला, धान्य यासह उसाच्या शेतीवरही किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही कीड रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. संपूर्ण नदीकाठावरील शेतीमधे घनरूप ७८.४२७ टन व द्रवरूपामधे ४५.५६० लिटर रासायनिक खते व कीटकनाशके शेतीमधे वापरली जातात. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होण्याबरोबरच लोकांनाही कीटकनाशकांच्या औषध उपचारांवर उगवलेला भाजीपाला व धान्य वापरावे लागत आहे.जमिनी खराबनदीकाठावरील या परिसरातील कित्येक गावांमध्ये या प्रदूषित पाण्यामुळे शेत जमिनीतील क्षार कमी होऊन (मीठ फुटल्याने) त्या शेतीची प्रत ढासळणे, उत्पादन कमी होणे, जमीन नापीक होणे, असे प्रकार घडत आहेत. पाण्याचा निचरा न होणाऱ्या कित्येक एकर जमिनी अशा प्रकारे खराब झाल्या आहेत.पंचगंगा नदी गावालगत असली तरी पिण्यासाठी आम्ही दुसऱ्या नदीचे पाणी वापरतो. मात्र, शेतीला हेच पाणी वापरावे लागत आहे. पावसाळा वगळता इतरवेळी पाणी अतिशय दुर्गंधीयुक्त व प्रदूषित असते. हेच पाणी पिकांना पाजवावे लागते. त्यामुळे शेतजमीन, पिकांना तसेच पाणी पाजविणाऱ्या शेतकऱ्यांच्या पायांना या पाण्याचा त्रास होतो.- अमित पाटील, ग्रामस्थ, हेरवाड.
१२ हजार हेक्टरवरील पिकेही बाधित
By admin | Updated: December 23, 2015 01:28 IST