नवी दिल्ली- लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा पूर्वपरीक्षेचा निकाल आयोगाने मंगळवारी घोषित केला असून, या परीक्षेत १६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हा निकाल ५० दिवसांत जाहीर करून आयोगाने एक विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या वर्षी हा निकाल जाहीर करण्यासाठी ६८ दिवसांचा कालावधी लागला होता. आॅगस्ट महिन्याच्या २४ तारखेला झालेल्या या परीक्षेत ४,५२,३३४ विद्यार्थी बसले होते. त्यातील १६,९३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे आयोगाचे सचिव असीम खुराणा यांनी सांगितले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी विद्यार्थ्यांच्या संख्येत ४० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे ते पुढे म्हणाले. यशस्वी उमेदवार डिसेंबर महिन्याच्या १४ ते २० तारखांना होणाऱ्या मुख्य परीक्षेला बसू शकतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. परीक्षेच्या उमेदवारांनी माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज देऊन हा निकाल जाणून घेण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन आयोगाने केले असून, हा निकाल परीक्षेची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सार्वजनिकरीत्या घोषित केला जाणार असल्याचे म्हटले आहे. याखेरीज अंतिम निकाल घोषित झाल्यानंतरच गुण, कापलेले गुण व २०१४ च्या नागरी सेवा परीक्षेची उत्तरे आदी माहिती उपलब्ध करून दिली जाईल. याबाबत माहितीच्या अधिकारान्वये कुठलाही अर्ज स्वीकारला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)जे उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले असतील त्यांनी १४ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी विस्तृत अर्ज भरावा असे आयोगाने म्हटले आहे.
यूपीएससी पूर्व परीक्षेत १६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण
By admin | Updated: October 15, 2014 03:34 IST