ऑनलाइन टीम
आगरा, दि. २५ - येथील नऊ मुलींच्या स्वप्नात देवी आल्या आणि त्यांनी उत्खननामध्ये आपल्या मूर्ती सापडतील असे सांगितल्याने जिल्हा प्रशासनाने चक्क त्या जागी उत्खनन हाती घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमध्येच काही दिवसांपूर्वी एका साधुच्या सांगण्यावरून अब्जावधी रुपयांचे सोने मिळवण्यासाठी एका किल्ल्यात पुरातत्व खात्याने उत्खनन केले होते. पुन्हा युपीमध्येच अशा अंधश्रद्ध घटना घडल्याने सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, या मुलींना चांगला सल्ला द्यायचे सोडून स्थानिकांनी मुलींनाच देव बनवून त्यांचे दर्शन घेण्यास व त्यांच्या पाया पडण्यास सुरुवात केली आहे. तसेच सभोवतालच्या जिल्ह्यांमधून लोक हा प्रकार बघण्यासाठी जमा होत आहेत. अनेक महिला लोटांगण घालत मुलींच्या पुजेला जात आहेत.
काही जणांनी प्रशासनाने मानसोपचार तज्ज्ञांद्वारे त्या मुलींवर उपचार करण्याची मागणी केली आहे. या आधी उत्तर प्रदेशात एका पुरातन किल्ल्यामध्ये सोनं सापडणार असल्याचे एका साधूने सांगितले होते. एका राजाने त्या साधूच्या स्वप्नात जाऊन आपल्या किल्ल्यात कित्येक टन सोनं असल्याचे सांगितले होते. त्यावरून अनेकांनी आपणच त्या राजाचे वंशज असल्याचे सांगत त्या सोन्यावर आपला दावा केला होता. परंतू प्रत्यक्ष उत्खनन झाल्यावर मात्र तिथे दगड व माती शिवाय दुसरे काहीच आढळले नाही