पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरीफ तडवी व त्याची पत्नीला घेऊन बुधवारी संध्याकाळी पहूर येथे सासरवाडीत आला मुक्कामी राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी पत्नीला माहेरी पहूर येथे सोडून सकाळी पाच वाजता दुचाकीवरून वीटभट्टीच्या कामासाठी औरंगाबादकडे निघाला. पहूर सोडून एक किलोमीटर अंतर गेल्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत आरीफच्या दुचाकीला अपघात झाला. यात आरीफ जागीच ठार झाला आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक अरूण धनवडे, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर ढाकरे, मनोज बाविस्कर व श्रीराम धुमाळ दाखल झाले. पहूर ग्रामीण रूग्णालयांमध्ये डॉक्टर नसल्याने रुग्णवाहिकेने मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. जामनेर येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन कोल्हे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
पश्चात मुलगा व पत्नी आहे. सासरे दिलीप तडवी यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.