वरखेडी, ता.पाचोरा : येथील १९ वर्षीय तरुणाचा शेतात काम करीत असताना सर्पदंशांने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली.ललित रमेश चौधरी (वय १९) हा शनिवारी सकाळी शेतात आईसह काम करीत असताना चक्कर येऊन जमिनीवर पडला. त्याला सर्पदंश झाल्याचे त्याच्या आईच्या लक्षात आले. तोवर त्याचा जागीच मृत्यू झालेला होता. गावातील स्थानिक डॉक्टरांना दाखविल्यानंतर त्याला पाचोरा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर त्याचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आली आहे.ललितच्या घरची परिस्थिती जेमतेम असून त्याच्या वडीलांचे निधन झालेले आहे. त्याच्या पश्चात आई व एक थोरला भाऊ असून ललित मोलमजुरी करून चरितार्थ भागवीत होता. तो येथील तेली तिळवण समाजाचे अध्यक्ष प्रकाश कडू चौधरी व दिगंबर कडू चौधरी यांचा भाचा होता.
वरखेडी येथे सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 20:33 IST