शिरसोली प्र. बो. येथील मोहाडी रोडला लागून सुशीलानगर असून या ठिकाणी पक्के रस्ते, पक्या गटारी व पिण्याची पाण्याची व्यवस्था ही येथील बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांनी केली असली तरी या भागातील गटारींचे पाणी पुढे निचरा होण्यास जागाच नसल्याने या गटारी तुंबल्या असून या गटारींचे पाणी रस्त्यावर येऊन सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तसेच या गटारींमध्ये मोठमोठ्या अळ्या तयार झाल्या असून त्या थेट रहिवाशांच्या घरांमध्ये येत असल्याने किळस येत आहे. या जिवघेण्या दुर्गंधीमुळे येथील रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
येथील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रार देऊनदेखील या तक्रारीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचे येथील रहिवाश्यांचे म्हणणे असून येथील गटारी त्वरित साफ करून या परिसरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी येथील रहिवासी हेमंत पाटील, राहुल ठोसरे,नीलेश बडगुजर, पंढरी कोळी,विनोद पाटील, विजय लावणे,संतोष जोशी,अमृत पाटील यांच्यासह येथील नागरिकांनी केली आहे.