पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अनेक महिन्यांपासून अनियमित आहे. पाणी केव्हा येईल यासंदर्भात काही वेळापत्रक नाही. कधीही कितीही वाजता रात्री- बेरात्री पाणीपुरवठा होतो. काही भागांमध्ये दोन- तीन दिवसांतून पाणी येते. काही भागांत दहा दिवसांतून तर कधी पंधरा दिवसांतून नळाला पाणी येते, तेही अशुद्ध असते.
पाण्यातून येतात गांडूळ
पाण्यातून अळ्या, गांडूळ, मातीमिश्रित पाणी असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात वेळोवेळी तक्रारी केल्या तरी काहीच उपायोग झालेला नाही. म्हणून नाइलाजाने महिलांनीच याविरुद्ध नगरपालिकेत येऊन मुख्याधिकाऱ्यांना नियमित पाणी मिळावे, अशी मागणी करणारे निवेदन दिले.
आठवड्यातून किमान दोन वेळा पाणी द्या
मुबलक पाणी असल्यामुळे कमीत कमी आठवड्यातून किमान दोन वेळा पाणी मिळावे व वेळापत्रक ठरवून देऊन योग्य नियोजन करून पाणी सोडावे, असे निवेदनात या महिलांनी म्हटले आहे.
पाइपलाइनला गळती
तसेच हायवेवरून जाणाऱ्या सर्व्हिस रोडला लागून असलेल्या नाल्यातून हुडकोवासीयांसाठी पाइपलाइन टाकलेली आहे. तेथे गळती असल्यामुळे नाल्यातील जंतुमिश्रित पाणीपुरवठा होतो. या सर्व बाबींची लवकरात लवकर मुख्याधिकाऱ्यांनी दखल घेऊन काहीतरी उपाययोजना करावी.
निवेदनावर स्वाती श्रीगोंदेकर, शकुंतला नितनवरे, अनिता राणे, अनिता जयस्वाल, कीर्ती दाभाडे, कल्पना नेहे, सुनीता सुनील राणे, अपर्णा श्रीगोंदेकर, अलका वाघरे, सुनीता अनिल राणे, विमल साकेगावकर, सुनंदा खरे, ॲड. जास्वंदी भंडारी (पाटील), शकुंतला राणे, तुषार जैस्वाल व प्रवीण कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या असून, या सर्व महिला यावेळी उपस्थित होत्या.
Photo:-
या नाल्यातून पाइपलाइन गेलेली असून, ती काही ठिकाणी लीक आहे.