सचिन देव
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासनाने ७ जूनपासून अनलॉक केल्यानंतर महामंडळातर्फे लांब पल्ल्याच्या बसेससह रातराणी सेवादेखील सुरू केली आहे. तर गेल्या आठवड्यापासून परराज्यातही सेवा सुरू केली आहे. मात्र, ग्रामीण भागातील बससेवा अद्याप सुरू न केल्यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. बससेवा बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना खासगी बसने जादा पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे.
`गाव तेथे एसटी बस` असे एसटी महामंडळाचे ब्रीद वाक्य आहे. कोरोनापूर्वी या वाक्यानुसार प्रत्येक गाव आणि वाडी वस्त्यांवर बसेस धावायच्यादेखील. मात्र, कोरोनामुळे ग्रामीण भागातील बससेवा पूर्णपणे ठप्प पडली आहे. जळगाव आगारातर्फे अनलॉक झाल्यापासून पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर, माहूरगड या मार्गावर नियमित बससेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच गेल्या आठवड्यापासून प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असतानाही, गुजरात मार्गावर बससेवा सुरू केली आहे. मात्र, तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये अद्यापही बससेवा सुरू न झाल्यामुळे या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
इन्फो :
आगारातील एकूण बसेस - ८०
कोरोनाआधी होणाऱ्या दररोज फेऱ्या - ४५०
सध्या सुरू असलेल्या फेऱ्या -२५०
इन्फो :
खेडेगावात जाण्यासाठी ‘खासगी रिक्षांचा`चा आधार
महामंडळातर्फे अनलॉक झाल्यानंतरही ग्रामीण भागातील बसफेऱ्या सुरू न केल्यामुळे, येथील नागरिकांना शहरात येण्यासाठी खासगी रिक्षांचाच आधार घ्यावा लागत आहे. जळगाव तालुक्यातील असोदा, वडली, आव्हाणे, रायपूर, नशिराबाद, शिरसोली या ठिकाणी असणारे नागरिकांना खासगी प्रवासी वाहनांनी शहरात यावे लागत आहे. यासाठी त्यांना जादा पैसे मोजावे लागत आहेत.
इन्फो :
१० लाख किमी प्रवास, पण फक्त शहराचाच :
जळगाव आगारातर्फे सरासरी सध्या २५ ते ३० हजार किलोमीटरपर्यंत बसेस चालविण्यात येत आहेत. गेल्या महिन्यात अनलॉक झाल्यानंतर जळगाव आगारातून पाच लाख किलोमीटरपर्यंत बसेस चालविण्यात आल्या तर आता जुलै महिन्यात १६ जुलैपर्यंत पाच लाख किलोमीटरच्या वर बसेस चालविण्यात आलेल्या आहेत. या सर्व बसेस शहरी मार्गावरच चालविण्यात आल्या आहेत. यातून महामंडळाला साडेतीन कोटींच्या घरात आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. तर सध्या उत्पन्नात जळगाव आगाराच आघाडीवर आहे.
इन्फो :
खेडेगावावरच अन्याय का?
ग्रामीण भागात बऱ्याच नागरिकांकडे स्वत:ची वाहने नसल्यामुळे त्यांना शहरात येण्यासाठी एसटी बस हा एकच चांगला पर्याय असतो. मात्र, कोरोनाचे कारण सांगून, महामंडळातर्फे अद्यापही ग्रामीण भागात सेवा सुरू न केल्यामुळे, खूप हाल होत आहेत. त्यामुळे खासगी वाहनांना जादा पैसे मोजून शहरात यावे लागत आहे.
किशोर चौधरी, आसोदा
इन्फो :
बससेवा बंद असल्यामुळे शहरात येण्यासाठी खासगी वाहनांचाच एक पर्याय असतो. त्यात खासगी वाहनांना जादा भाडे मोजावे लागते. त्यामुळे महामंडळाने प्रवाशांच्या गैरसोयीचा व सुरक्षेचा विचार करून, तात्काळ ग्रामीण भागातील बससेवा सुरू करावी.
हर्षल पाटील, आव्हाणे
इन्फो :
जळगाव आगारातर्फे गेल्या दोन दिवसांपासून ग्रामीण भागातील सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे. सध्या शाळा-महाविद्यालय बंद असल्याने, ग्रामीण भागातील सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेली नाही. शाळा सुरू झाल्यावर प्रत्येक गावांना बसेस सोडण्यात येतील. तर आताही टप्प्याटप्प्याने सेवा सुरू करत आहोत.
नीलेश पाटील, व्यवस्थापक, जळगाव आगार