गेल्या काही दिवसांपासून संततधारेमुळे कापूस पिकावर लाल्या रोग व बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडून कर्जाच्या खाईत ढकलला जात आहे.
वाघडूसह वाकडी, रोकडे, हातले, वाघले, चाभार्डी, जामडी, बानगाव परिसरातील कापूस पिकावर लाल्यासह बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाच्या पूर्ण शेतावर आक्रमण होत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
ऐन कापूस पीक घरात येण्याच्या तोंडावर कापूस काळा पडून उत्पादनात मोठी तफावत येणार आहे. सध्या शेतकरी कापूस पीक वाचवण्यासाठी विविध फवारणी करून कसेबसे उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करीत आहे. मात्र पाहिजे तसे उत्पादन हातात येणार नसल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. कापूस पिकाचा पंचनामा करून नुकसानभरपाई मिळवण्यासाठी संबंधित विभागाने प्रयत्न करावेत, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.