एरंडोल : तालुक्यातील शेतकरी आता चक्क गॅस पिकवणार आहेत. गवतापासून गॅस निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे उभारला जात आहे. त्याचे भूमिपूजन लवकरच होणार आहे.
शेतकऱ्यांकडून एक हजार रुपये टन या दराने हत्तीगवत खरेदी करून त्यापासून प्रतिदिन एक हजार टन गॅस निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कोविड स्थिती आटोक्यात आली, तर दिवाळीपासून, अन्यथा २६ जानेवारी २२ पासून कोणत्याही स्थितीत गॅस उत्पादन सुरू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होत आहेत. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील प्रकल्प येथे प्रत्यक्षात आकार घेणार आहे.
मुंबईच्या मीरा क्लीन फ्युएलस (एमसीएल) या मुख्य कंपनीतर्फे प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये गडहिंग्लज फार्मर प्रोड्युसर कंपनी शेतकऱ्यांची कंपनी स्थापन करण्यात येईल, त्यामार्फत गवत उत्पादन होईल. व्हेंचुरीक एनर्जी प्रायव्हेट कंपनीतर्फे प्रत्यक्ष गॅस उत्पादन करण्यात येईल. ग्रामीण भागात शेतकरी आता जनावरांचा ओला चारा म्हणून मोठ्या प्रमाणावर हत्ती गवताची उत्पादन घेत आहे. त्यातील ‘सुपर नेपियर’ म्हणून विकसित वाण यासाठी वापरण्यात येणार आहे. त्याचे बियाणे कंपनी पुरविणार आहे. या पिकाला फारसे कष्ट लागत नाही. खतेही फार लागत नाही. जमीन हलक्या प्रतीची असेल तरी चालते. अडीच महिन्यात एकरी ४० टन गवताचे उत्पादन होते. कंपनी एक हजार रुपये टन या दराने ते शेतकऱ्यांकडून विकत घेईल.
वार्षिक दीडशे टन उत्पादन धरले, तरी दीड लाख रुपये शेतकऱ्याला मिळतील. गडहिंग्लन फार्मर कंपनीचे तालुक्यात सध्या चोवीसशे शेतकरी सभासद झाले आहेत. दहा हजार सभासद करून घेण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येकी पाचशे रुपये भरून घेतले जात आहेत. त्यातून २५० रुपये शेअर्स तर तेवढ्याच रकमेची त्यांना खते दिली जाणार आहेत. ऊस एकरी चाळीस निघाला तरी त्यातून १ लाख २० हजारांची उत्पन्न मिळते. त्यातील निम्मी रक्कम खर्चापोटी जाते असे कळविण्यात आले आहे.