लेखक- प्रा. डॉ. सतीश मस्के, पिंपळनेर
रस्त्याने जाता-जाता भांडे घासणाऱ्या एक मावशी भेटल्या. थांबलो अन् त्यांना विचारले,
‘काय चाललंय मावशी’
‘काही नाही, काम करून घरी जातेय सर.’
‘इतक्या उशिरा’
‘हो मग काय करावे सर, आता कामे वाढली आहेत.’
‘प्रत्येकाच्या घरी बाहेर शिकायला गेलेली मुलं कोरोनामुळे घरी आली आहेत. त्यो मोठा आजार आलाय म्हणं. त्यांना सुट्या दिल्या आहेत.’
‘मी हसत-हसत म्हणालो, तुम्हाला नाहीत सुट्या.’
‘आम्हाला कशाच्या आल्यात सुट्या... आम्हा गरिबाचं काय खरं हाय...आम्ही कुणाच्या मापात नाहीत. आमचं हातावर पोट हाय. काम केलं तर खायला मिळतंय. आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नोकरदार माणसांचा वेगळाच आहे. खरं तर उलट मला आता जास्त काम लागत आहे. कपडे, भांडे जास्तीचे धुवावे लागत आहेत. म्हणून घरी जायला ह्यो टाइम झाला आहे. आम्ही काम केलं तरच पोटाला मिळणार आहे. आमच्या मुलाबाळांना खायला मिळणार आहे. आमचा न सरकार न कोण बी विचार करीत नाही वो सर.’
‘हो मावशी, तुमचं म्हणणं सारं खरं आहे; पण कोरोना नावाचा महाभयंकर आजार आला आहे.’
‘हो सर, तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. तुम्हाला तरी सरकारने सुट्या दिल्या आहेत. सरकार पगार देईन; पण आमच्यासारख्या गरिबांचे काय? बेहाल आहेत. आमच्याकडे लोक कामगार म्हणून बघतात. आमच्या भावना, दुःख, व्यथा, वेदना याचं काहीच कुणाला देणं-घेणं नाही. काय करावे, कुणाला सांगावे? नशिबाचे भोग आहेत सारे.’‘हो, तुमचे म्हणणे बरोबर आहे... मावशी; पण तुम्ही कोरोनापासून बचाव करा. सगळ्यांची काळजी घ्या.’
‘हो, पण कशाची आली काळजी, हल्ली माणसं माणसासारखी वागत नाहीत. पहिला जमाना आता राहिला नाही. पहिल्या काळासारखी माणसं माणुसकीची राहिली नाहीत. बाई घरकामाला लावली म्हणजे तिच्याकडून किती काम करून घ्यावं हे नोकरदार, पैशावाल्या, पगारदार माणसांना समजतच नाही... काय करावं, काम केल्याशिवाय गत्यंतर नाही.’
‘हो मावशी, माणसं आता पहिल्यासारखी राहिली नाहीत. माणुसकी विसरत चालली आहेत. कोणाला कोणाचं देणं-घेणं राहिलेलं नाही. तरीही तुम्ही कोरोनापासून सावध राहा. तुमची, तुमच्या घरच्यांची काळजी घ्या. येतो.’
‘हो ठीक आहे, काळजी घेतो; पण आम्ही कामगार माणसं, कामावाली माणसं.’ ‘आम्ही बी माणसं आहोत’ हे मात्र आजची हल्लीची माणसं विसरत चालली आहेत.
खरे तर त्या मावशीचे बोलणे ऐकून समाजातील मानवता हरवत चालली आहे असेच चित्र दिसत आहे. म्हणून वेळप्रसंगी माणसाने माणसाला समजून घेऊन माणुसकीने वागणे महत्त्वाचे आहे. कोरोनाने खूप काही शिकविले आहे हे प्रत्येकाने ध्यानात घ्यायला हवे. माणूस म्हणून जगायला शिकले पाहिजे. स्वार्थ, अहंकार, मोठेपणा, जात, धर्म बाजूला फेकला पाहिजे. प्रेम आणि मानवतेचा धर्म जागवायला हवा.