नशिराबाद: गावातून जाणारा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. काम पूर्ण करण्याच्या हातघाईने या कामात असंख्य अक्षम्य चुका झाल्या असल्याचा आक्षेप घेत सदरील चुका येणाऱ्या कालखंडात समोर येत आहे. त्याचे दूरगामी परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहे. बोगद्याजवळ दोन्ही बाजूंना नहीच्या अक्षम्य चुकीमुळे पावसाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर तळे साचत आहे. त्यामुळे तिथून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रसंगी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यावर तत्काळ उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांनी केली असून, महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की नशिराबाद शहरातून सुनसगाव बोदवड मलकापूर राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्गावरून वेगळा होऊन जातो त्या ठिकाणी नियमाप्रमाणे २५×७ मीटरचा बोगदा देण्यात आला आहे. सदरचा बोगदा हा त्या ठिकाणी सुनसगाव रस्त्याचा फाटा आहे त्या ठिकाणी आलेला नसून चुकीच्या पद्धतीने बांधकाम झालेला असल्याचे दिसते. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याचा संभाव्य धोका मोठ्या प्रमाणावर आहे. नशिराबाद येथील पोलीस स्टेशनसमोर तरसोद गणपती देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच भादली रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर महालक्ष्मी मंदिराजवळ राष्ट्रीय महामार्गावर या ठिकाणी भुयारी मार्ग मिळावा यासाठी २५ मे २०१९ रोजी बैलगाडी यांनी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यानुसार पोलीस स्टेशनसमोर त्या ठिकाणी बोगदा करण्यात आला मात्र सदर भुयारी बोगद्याचे काम अपेक्षित उंची जुळवितांना या ठिकाणी खोली करण्यात आली नाही. त्यामुळे पावसाळ्यात पुलाच्या दोन्ही बाजूला सर्विस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचते व लोकांना त्या ठिकाणी रहदारीस अडथळा निर्माण होऊन अपघातसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पाणी वाहून नेण्यासाठी शहराजवळील गटार बांधकाम न झाल्याने गावातील दोन्ही बाजूंच्या वस्त्यांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर साचत आहे. याबाबत तत्काळ दखल घेऊन तोडगा काढण्यात यावा अशी मागणी निवेदनात पंकज महाजन यांनी केली आहे. नागरिकांचे हाल थांबावे, अशी मागणी करण्यात आली आहे.