- डमी
दिरंगाई : विलंबाने होणाऱ्या लसीकरणामुळे पशुपालक चिंतेत
जळगाव : दरवर्षी जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे पाळीव जनावरांना होणाऱ्या तोंडखुरी, पायखुरी यासह इतर संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होण्यासाठी मे महिन्यात लसीकरण मोहीम हाती घेतली जाते; मात्र यंदा शासनातर्फे अद्याप लसीचा पुरवठा न झाल्याने जनावरांचे लसीकरण रखडले आहे. एकीकडे कोरोनाच्या लसीचा तुटवडा होत असल्यामुळे माणसांचे लसीकरण लांबत असून, दुसरीकडे शासनातर्फे पाळीव जनावरांना दिली जाणारी लस उपलब्ध न झाल्यामुळे पशुपालक चिंतेत सापडले आहेत.
गेल्यावर्षी कोरोनामुळे जनावरांचे लसीकरण लांबले असताना, यंदाही पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाल्याने पुन्हा जनावरांचे लसीकरण लांबले आहे. मे महिना संपत आला तरी, जनावरांना पावसाळ्यात येणाऱ्या साथीच्या रोगाकरिता लसीकरण मोहीम सुरू न झाल्याने पशुपालक चिंतेत पडले आहेत. जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे जनावरांचे मान्सूनपूर्व प्रतिबंधक लसीकरण प्रत्येक वर्षी मे महिन्यात केले जाते. प्रत्येक गाव व तालुकास्तरावर यासाठी विशेष यंत्रणा तयार केली जाते. पाऊस पडल्यानंतर शेतकरी बांधव शेती कामात व्यस्त राहत असल्याने, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लसीकरण मोहीम पूर्णतः यशस्वी केली जाते; मात्र यंदा शासनाकडून अद्याप लस उपलब्ध न झाल्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून राबविला जाणारा लसीकरण कार्यक्रम रखडला आहे.
पावसाळ्यात पाळीव प्राण्यांना प्रामुख्याने घटसर्प व अतिसार या विषाणूजन्य रोगाचा धोका जास्त असतो. नदी व नाल्यांना पूर आला की, या विषाणूंचा फैलाव जास्त होतो. त्यामुळे या संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होण्यासाठी गाय, म्हशी यांना मोठ्या पाळीव प्राण्यांना घटसर्प, फऱ्या व लाळ्या खुरकत या लसी दिल्या जातात; मात्र यंदा पुन्हा या लसीकरणाला विलंब झाल्यामुळे पावसाळा सुरू झाल्यावर जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी संबंधित विभागाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी बांधवांतर्फे करण्यात येत आहे.
------
जिल्ह्यातील जनावरांची संख्या
अ) गाय : ५ लाख ५२ हजार २१३
ब) म्हैस : २ लाख ५७ हजार ४९२
क) शेळी : ३ लाख ४९ हजार १०३
ड) मेंढी : ३८ हजार १५६
-----==
गेल्यावर्षीही कोरोनामुळे आमच्या पाळीव जनावरांचे लसीकरण लांबले होते आणि यंदाही मे महिना सुरू झाल्यानंतरही जनावरांच्या लसीकरणाला सुरुवात झालेली नाही. पावसाळा सुरू झाल्यावर जनावरांना साथीच्या आजारांपासून धोका असतो, त्यामुळे प्रशासनाने तातडीने लसीकरण करणे गरजेचे आहे.
- छगन चौधरी, पशुपालक
------
शेतकरी बांधवांचे उत्पन्नाचे साधन म्हणजे पाळीव जनावरे असतात. पावसाळ्यात या जनावरांमध्येही साथीचे संसर्गजन्य आजार निर्माण होण्याची शक्यता असते. गेल्यावर्षी कोरोनामुळे काही दिवस लसीकरण लांबले होते. आताही तशी परिस्थिती दिसून येत आहे.
-संजय ढाके, पशुपालक
----=
जनावरांना या प्रकारच्या दिल्या जातात लसी
जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे गायी व म्हशींना पावसाळ्यापूर्वी
घटसर्प, फऱ्या व लाळ्या खुरकत या लसी दिल्या जातात. दर सहा महिन्याच्या अंतराने हे लसीकरण केले जाते. तसेच शेळ्या व मेंढ्यांना पीपीआर नावाचे लसीकरण केले जात असल्याचे सांगण्यात आले.
--
यंदा लसीकरणासाठी काहीसा उशीर झाला असला तरी शेतकरी बांधवांनी काळजी करण्यासारखे काही नाही. पुढच्या आठवड्यात लस उपलब्ध होणार आहे. जिल्हाभरात २० ते २१ दिवसात लसीकरण पूर्ण केले जाईल. प्रत्येक गावापर्यंत पाळीव जनावरांच्या लसीकरणासाठी आमची यंत्रणा कार्यरत राहणार आहे.
-डॉ. अविनाश इंगळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.