लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मेहुण्याकडे असलेल्या नातेवाईकाच्या दोन वर्षाच्या मुलाचा वाढदिवस साजरा करून दुचाकीवरून घरी परत येत असताना, समोरून येणाऱ्या चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात कडगाव (ता. जळगाव) येथील काका व दोन पुतणे जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सात वाजता अक्कलकुवा तालुक्यातील डेडवा गावाजवळ घडली. मोहन कडू मोरे (२२), तसेच त्याचे पुतणे कुणाल एकनाथ मोरे (७) व रोहित कैलास मोरे (८) अशी मृतांची नावे आहेत. वहिनी मुक्ताबाई एकनाथ मोरे (३५) या जखमी झालेल्या आहेत. सोमवारी सायंकाळी कडगावात एकाचवेळी तिघांची अंत्ययात्रा निघाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन मोरे हा भाऊ एकनाथ व कैलास यांच्यासोबत अक्कलकुवा तालुक्यात विटा पाडण्यासाठी नोव्हेंबर महिन्यापासून गेलेला होता. मोहन राहत असलेल्या गावापासून पाच-सहा किलोमीटर अंतरावर वीटभट्ट्यांवर त्याचे मेहुणे कामाला होते. त्याठिकाणी रितेश नरेश शिरसाळे (वय २) या नात्यातील मुलाचा रविवारी वाढदिवस होता. त्यासाठी मोहन हा पुतणे कुणाल, मोहित व वहिनी यांना घेऊन दुचाकीने गेलेला होता. वाढदिवस साजरा केल्यानंतर तेथून परत येत असताना शेवाळी - नेत्रंग राष्ट्रीय महामार्गावर गुजरातकडे जाणाऱ्या चारचाकीने (क्र. एमएच ४३ बी.यु.८१६२) त्यांच्या दुचाकीला (क्र. एमएच १९ बी.बी.५३०४ ) जोरदार धडक दिली. त्यात तिघेजण जागीच ठार झाले, तर वहिनी मुक्ताबाई या जखमी झाल्या. महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या सीमेवरील महाराष्ट्र हद्दीतील डोडवा फाट्यानजीक हा अपघात घडला.
काही दिवसांवर होते लग्न
मोहन याचा नांदेड ता. धरणगाव येथील मुलीशी विवाह निश्चित झालेला होता. दोन महिन्यापूर्वीच नारळगोट्याचा कार्यक्रम झालेला होता. येत्या काही दिवसात लग्नाची तारीख निश्चित करण्यात येणार होती. तत्पूर्वीच ही घटना घडली. मोहन याच्या वडिलांचे दहा वर्षांपूर्वीच निधन झालेले आहे. त्याच्या पश्चात आई सराबाई, दोन भाऊ, वहिनी व पुतणे असा परिवार आहे.