जळगाव : मोबाईलवर बोलत रस्त्याने चालत असलेल्या लोकांचे मोबाईल हिसकावून त्याची पारोळ्याच्या बाजारात विक्री करणाऱ्या चेतन योगेश पाटील (वय २२) व सागर रवींद्र पाटील (दोन्ही रा. पारोळा) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून चोरलेले दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
कुऱ्हे, ता. अमळनेर येथील एका रसवंतीवर मोबाईलवर बोलत असलेल्या एका व्यक्तीच्या हातातून दोघांनी मोबाईल लांबविला होता. त्यानंतर दुसरा मोबाईल आंचळगाव, ता. भडगाव गावाच्या पुढे एका जणाच्या हातातून हिसकावून पळ काढला होता. या दोघांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्याने चालणाऱ्या लोकांचे मोबाईल लांबविल्याची शक्यता वर्तविली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील व सचिन महाजन यांच्या पथकाने या दोघांचा भांडाफोड केला. दरम्यान, दोघांना अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्यावर दुचाकी चोरीचेही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.