नशिराबाद : ब्रिटिशांच्या काळात ऐतिहासिक व औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नशिराबाद येथील मानाच्या गणपतीला सुमारे १२८ वर्षांची अखंड परंपरा आहे. गेल्यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. नशिराबाद कोरोनामुक्त असले तरी शासनाचे निर्बंध कायम आहे. त्यामुळे यंदाही साधेपणाने उत्सव साजरा करण्यात येत आहे.
येथे सार्वजनिक मंडळाच्या गणेशाला मानाचा गणपती म्हणून ओळखले जाते. मंडळाचे यंदा १२८ वे वर्ष असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. येथील प्राचीन विष्णू मंदिरात मानाच्या गणपतीची स्थापना करण्यासाठी तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाने १८९४ पासून नशिराबाद येथे गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. श्रींच्या स्थापनेची भव्य मिरवणूक काढून विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येते. तसेच विसर्जन मिरवणूक विष्णू मंदिरापासून निघते. अग्रभागी मानाच्या गणपतीची पालखी असते त्यामागे गावातील इतर मंडळांच्या गणपतीची वाहने असतात.
यंदा नवीन लाकडी सागवानी पालखी
जुनी लाकडी पालखी जीर्ण झाल्यामुळे यंदा नवीन पालखी बनवण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील कळवा येथून कारागिरांनी तयार केलेल्या आकर्षक लाकडी सागवानी पालखीतून श्रींचा विसर्जन होणार आहे, अशी माहिती मंडळाचे खजिनदार केदार भट यांनी लोकमतला दिली.
कार्यकारिणी मंडळ
अध्यक्ष- प्रदीप माळी, उपाध्यक्ष प्रीतम चौधरी, सचिव विजय सावकारे, खजिनदार केदार भट, सभासद दीपक जावळे, संतोष सोमवंशी, धनंजय वाणी, नरेंद्र माळी, मोहन राणे, सुधीर कोष्टी, किरण चौधरी, दिनेश देवांग, विजय मिस्त्री, भूषण माळी, ललित कावळे, प्रशांत कावळे यांचा समावेश आहे.