जळगाव : कोंबडी बाजार चौकातील टीव्हीएस शोरूममध्ये रात्री चोरी झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. दरम्यान, चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. शोरूममध्ये त्याच्या हाती रोकड लागली नाही. मात्र, जाताना त्याने लॅपटॉप आणि मोबाइल लांबविला आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.
कोंबडी बाजार चौकात योगेश अशोक चौधरी (वय ४५, रा. गणपतीनगर) यांचे पंकज टीव्हीएस नावाचे शोरूम आहे. सोमवारी रात्री ९ वाजता शोरूम बंद झाल्यानंतर सर्व कर्मचारी घरी निघून गेले. मंगळवारी सकाळी ८ वाजता कर्मचारी कामावर आले, तेव्हा चोरी झाल्याचे समोर आले. शोरूममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्री ११.३० वाजेच्या एक चोरटा शोरूमची टेहाळणी करताना दिसून येत असून वरच्या मजल्यावरून लिफ्टच्या रोपद्वारे खाली उतरला आहे. लिफ्टच्या वरती उभा राहून लिफ्टजवळील चायनल गेटचे कुलूप त्याने तोडले आहे. त्यानंतर शोरूममधील लोखंडी लॉकरमध्ये रोकड असल्याचा अंदाजानुसार त्याने लोखंडी लॉकर तोडले; परंतु त्यात चेकबुक व टॅबशिवाय काहीही हातात आले नाही. त्यानंतर व्यवस्थापकाच्या दालनात जाताना दिसत आहे. तेथे टेबलाचे ड्रॉवर आणि कपाटातील कागदपत्रे काढलेली दिसून आली. तेथेही रोख रक्कम हाती न लागल्याने लॅपटॉप व मोबाइल घेऊन चोरटा पसार झाला. शोरूमच्या गच्चीवरील लिफ्टचे एक चायनल गेट उघडेच होते. दरम्यान, शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.