धरणगाव :शासनाने राज्यातील माध्यमिक, प्राथमिक शिक्षकांचा पगार तसेच ४ महिन्यांचा मागील फरक दिवाळीपूर्वी म्हणजे १८ ऑक्टोबरपर्यंत मिळणार असल्याची घोषणा ऑक्टोबरच्या सुरुवातीला केली होती, परंतु ही घोषणा कागदावरच राहिल्याचे स्पष्ट झाले असून जळगाव जिल्हा शिक्षक संघटनेने निवेदनाद्वारे पगार लवकर करण्याची मागणी केली आहे.
शासनाने राज्यातील शिक्षकांचा पगार तसेच फरक दिवाळीपूर्वी देणार असल्याची घोषणा केली होती, त्या वेळी शिक्षकांना केंद्राप्रमाणे १0 टक्के महागाई भत्ता मिळणार अशी आशा होती. ४ महिन्यांचा मिळणारा फरक व १८ ऑक्टोबरला (म्हणजे दिवाळीपूर्वी) मिळणार म्हणून शिक्षकवर्गाला समाधान वाटले होते. याविषयी शिक्षक आमदार डॉ.सुधीर तांबे यांनीही शिक्षकांचा पगार व फरक १८ पर्यंत मिळणार असल्याचे घोषित केले. मात्र शासन व आमदारांच्या घोषणा कागदापुरत्याच र्मयादित राहिल्या की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आतापर्यंत म्हणजे २0 ऑक्टोबरपर्यंत शिक्षकांचे वेतन जमा झालेले नव्हते. त्यामुळे शिक्षकवर्गाने केलेले नियोजन कोलमडले असल्याने शिक्षकवर्गात नाराजी दिसून येत आहे. यासंदर्भात जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकार्यांना निवेदन देऊन दिवाळीपूर्वी वेतन मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.