गेल्या काही वर्षांत स्पर्धा परीक्षांकडे तरुण-तरुणाईचा मोठा कल वाढला असून, या परीक्षांमध्ये कठोर मेेहनत मुले यशस्वीदेखील होत आहेत. त्यानुसार जून २०२० मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहीर करण्यात आलेल्या मुख्य परिक्षेच्या निकालात जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. यात कुणी डेप्युटी कलेक्टर, कुणी डेप्युटी सीईओ तर कुणी तहसीलदार झाले आहे. या विद्यार्थांना समाजात मान-सन्मान मिळण्याबरोबरच त्यांच्या आई-वडिलांचीदेखील मान उंचावली आहे. मात्र, क्लासवन अधिकारी होऊनही, या विद्यार्थांचे सरकरी खुर्चीवर बसण्याचे स्वप्न वर्ष उलटूनही पूर्ण झाले नसून, चाळीसगाव येथील अभिषेक कासोदे या सारखे क्लासवन अधिकारी झालेले तरुण पोटा पाण्यापुरता कोचींग क्लासेस घेऊन पर्यायी रोजगार शोधत आहेत.
इन्फो :
तर शासनाच्या दुर्लक्षामुळे बेरोजगार..
जून २०२० मध्ये एमपीएससीच्या परिक्षेचा निकाल लागल्यानंतर डेप्युटी सीईओपदी माझी निवड झाली आहे. कठोर मेहनतीनंतर यश मिळाल्याने, खूप आनंद झाला. मात्र, वर्षाभरापासून शासनाने नियुक्ती दिली नसल्यामुळे अनेक मुले घरी बसून आहेत. सध्या मी स्पर्धा परीक्षांचे क्लास घेत आहेत. नियुक्ती लवकर देण्यात येत नसल्याने, शासनाने निदान शिष्यवृत्ती तरी द्यावी.
-अभिषेक कासोदे, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी
इन्फो :
नियुक्ती नसल्यामुळे, जमलेले लग्नही लांबले
कासोदे यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर काही महिन्यांनी लग्न जमले. मात्र, शासनाकडून नियुक्ती मिळत नसल्यामुळे जमलेले लग्न लांबणीवर पडलेले आहे. कारण, लग्न केल्यानंतर कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारातून संसार तरी कसा चालवायचा, हा प्रश्न पडतो. त्यामुळे ‘छोकरी आहे, मात्र नोकरी नाही’, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचेही अभिषेक कासोदे यांनी सांगितले.
इन्फो :
जून २०२० मध्ये स्पर्धा परीक्षेच्या लागलेल्या माझी तहसीलदारपदी निवड झाली आहे. मात्र, शासनाच्या नियुक्तीची वर्षभरापासून वाट पाहत आहे. मात्र, यापूर्वीही मी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालो असल्याने, सध्या मंत्रालयात आरोग्य विभागात कक्ष अधिकारी म्हणून नोकरी करत आहेत.
-राहुल मोरे, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी