जळगाव : जिल्ह्यात मागील वर्षभरात ठकबाजीच्या २०३ तर विश्वासघात केल्याच्या ६६ अशा एकूण २६९ घटना फसवणुकीच्या घडल्या असून, सरकारी नोकरांवरही हल्ल्याच्या ९४ घटना घडलेल्या आहेत. त्याशिवाय आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे ६४ गुन्हे दाखल झालेले आहेत. लॉकडाऊन असतानाही २०१९ च्या तुलनेत मागील वर्षभरात गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.
२०१९ मध्ये विश्वासघातचे ६४, तर ठकबाजीने शतक पूर्ण झाले होते. एकूण १६४ गुन्हे दाखल झाले होते. यंदा त्यात १०५ ने वाढ झाली आहे. २०१९ मध्ये ९२ टक्के गुन्हे उघड झाले होते, तर मागील वर्षी फक्त ५६ टक्केच गुन्हे उघड झाले आहे. दाखल गुन्ह्यांची संख्या जास्त तर नाउघड गुन्ह्यांची संख्या कमी आहे. २०१९ मध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे ४३ गुन्हे दाखल झाले होते, यंदा त्यात २१ ने वाढ झाली आहे. सरकारी नोकरांवरील गुन्ह्यातही वाढ झाली आहे. सर्वाधिक हल्ले हे पोलिसांवरच झालेले आहेत. मारहाण व गंभीर दुखापतीचे मागील वर्षी ७२३ गुन्हे दाखल झाले आहेत, तर ७१२ गुन्हे उघड झाले आहेत. २०१९ मध्ये ६०६ गुन्हे दाखल होऊन ६०० गुन्ह्यात आरोपींना अटक झाली होती. दंगलीच्या गुन्ह्यात शंभर टक्के आरोपींना अटक झालेली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांत ३९४ अपघातात लोकांची जीव गेलेला आहे. सदोष मनुष्यवधाचे ७ गुन्हे दाखल झालेले आहेत. निष्पाप व्यक्तींचा जीव गेल्याचे हे प्रकरण आहेत. दरम्यान, पळवून नेल्याप्रकरणी देखील वर्षभरात १७३ गुन्हे दाखल असून, त्यापैकी ११५ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
५३३ दुचाकींची चोरी
जिल्ह्यात मागील वर्षभरात ५३३ दुचाकींची चोरी झाली असून, अवघ्या ९५दुचाकी शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. २०१९ मध्ये ४६७ दुचाकी चोरी झाल्या होत्या, त्यापैकी १२५ दुचाकी शोधण्यात आल्या आहेत. दुचाकी चोरीची संख्या मोठ्या प्रमाणात असताना त्यांचा शोध घेण्यात यंत्रणा कमी पडत आहेत. २०१९ मध्ये २७ तर मागील वर्षात १८ टक्के दुचाकी चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत.
अशा आहेत महत्त्वाच्या घटना
गुन्ह्याचा प्रकार दाखल उघड
विश्वासघात ६६ ५९
ठकबाजी २०३ ११४
पळवून नेणे १७३ ११५
दुचाकी चाेरी ५३३ ९५
दुखापत ७२३ ७१२
आत्महत्येस प्रवृत्त ६४ ६४
प्राणंतिक अपघात ३९४ ३१९