बोदवड : तालुक्यातील रेवती या ग्रुप ग्रामपंचयात मध्ये गावठाण जागेवरुन ृवृद्ध आणि एका महिलेत वाद होऊन वृद्ध जखमी झाला तर महिलेने विषारी द्रव्य सेवन केले. या घटनेमुळे मात्र गावात संताप व्यक्त होत असून घटनेला सरपंच जबाबदार असल्याचा आरोप करीत गावकरी पोलीसस्टेशनवर येऊन धडकले.या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सदर गावठाण जागेत लोढू आनंदा सपकाळ (वय ७५) हे पत्नीसह राहतात. सदर जागेत गुरुवारी संध्याकाळी गावातीलच रहिवासी नज्जोबी शे आरिफ या महिलेने सदर जागा सरपंच संजय पाटील यांनी माझ्या नावावर केली आहे, असे सांगत जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यात दोघात वाद होऊन मारहाण झाली. या मारहाणीत लोढू सपकाळे हे रक्तबंबाळ झाले. तर नज्जोबी यांनीही काहीतरी विषारी प्राशन केले असून दोघांना उपचारासाठी रुणालयात हलविले आहे. सदर प्रकरणाने गावातील वातावरण तापले आहे. यामुळे सुमारे चाळीस ते पन्नास महिला व पुरुष बोदवड पोलीस ठाण्यात आले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हा युवा अध्यक्ष हितेश पाटीलही हजर झाले. गावातील शांतता सरपंच संजय पाटील हे भंग करीत असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. बराच वेळ ते पोलीस ठाण्यात बसले होते.
गावठाण जागेवरुन हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 22:13 IST